उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या विनाशकारी प्रलयामध्ये अडकलेल्या हजारो यात्रेकरू व स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी ‘अखिल भारतीय मारवाडी युवा मंच’ व्दारा ‘राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता कोष’ मधून एक कोटी रुपयांचे साहित्य वितरित करणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत  केली. कोल्हापुरातील व्हाईट आर्मी या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले. उत्तराखंडमध्ये नैसर्गिक प्रकोपाचे विक्राळ स्वरूप अनुभवावे लागत असून आजअखेर हजारो यात्रेकरूंनी जीव गमविला असून अद्याप पन्नास हजार यात्रेकरू विविध ठिकाणी अडकलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३ हजारहून अधिक यात्रेकरूंचा समावेश आहे. या लोकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता असून मारवाडी युवा मंचतर्फे जेवन, ब्लँॅकेट्स व औषधांचा समावेश असलेला पहिला ट्रक गुरुवारी ऋषीकेश येथे पोहोचला असून येथील कँम्पमधून जवानांच्या साहाय्याने या साहित्याचे वितरण सुरू केले आहे. हरिव्दार येथील मुख्य कँपव्दारे स्थानिक पदाधिकारी यांची देखरेख करीत असून उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, डेहराडून येथील शिबिरे रविवारपासून कार्यान्वित होत आहेत.     
महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी हरिव्दार येथे विशेष मतदान केंद्र सुरू केले असून युवा मंचचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी (पुणे) या कक्षाचे नियंत्रण करीत आहेत. मुख्यमंत्री कार्यालय, उत्तराखंड येथील अधिकारी डॉ. पियूष राऊतेला या केंद्रासाठी विशेष सहकार्य करीत आहेत. उत्तराखंडमधील आपत्कालीन मदत केंद्रासाठी विविध राज्यातून युवा मंचचे ५०० पदाधिकारी सहभागी होत असून आतापर्यंत महाराष्ट्र,दिल्ली, राजस्थान व कर्नाटकचे पदाधिकारी उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत.     
अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या विशेष आपत्कालीन मदत केंद्रांसाठी हेल्पलाईन फार्मसी-दिल्ली, अखिल भारतीय मारवाडी संमेलन-कोलकाता, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट), व्हाईट आर्मी-कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले असून तीर्थकर महावीर विश्वविद्यालय-मोरादाबाद यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातर्फे २० डॉक्टरांचे पथक वेगवेगळ्या शिबिरातून सेवेसाठी दाखल झाले आहे. अ.भा.मा. युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी देशभरातील समाजसेवी संस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. बिझनेस हाऊस, राजारामपुरी १० वी गल्ली, कोल्हापूर (०२३१-२५२५२५१) येथे विशेष कक्ष कार्यान्वित केला आहे.

Story img Loader