अनघाचे वडील गेले तेव्हा माझ्यावर खरे तर आकाशच कोसळले. माझ्या मुलांनीच मला त्यातून बाहेर काढले. दोन महिने मी घरात बसून होते. पण मुलांनी मला धीर दिला की आई आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तू आणि पपांनी जे ठरवले होते त्यानुसार आपण करू. तुम्ही दोघांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण होतील, असा दिलासा देत त्यांनीच मला सावरलं. अनघा तेव्हा नववीत होती, चैतन्य सहावीत शिकत होता. अनघा एकेक गोष्ट मला सांगायची. माझ्याशी चर्चा करायची. मला समजावायची. खूप लहान वयात माझी दोन्ही मुले मोठी झाली. एकटीने त्यांना वाढविताना सामाजिक, आर्थिक, वेगवेगळ्या स्तरावरच्या अडचणी होत्या. माझ्या सासऱ्यांनी आणि दिराने मला पाठिंबा दिला. आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत. पण तू खंबीर राहा. जे काही करायचे ते तुलाच निर्णय घेऊन सगळे पुन्हा उभारायचे आहे, असे ते नेहमी सांगत. मी शिक्षिका असल्यामुळे तशी आर्थिक अडचण जाणवली नाही. पण जे ठरवले होते, ते सगळे बारगळले. गरजा मर्यादित झाल्या. एकंदरीत सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला. माझी आर्थिक स्थिती, सासर-माहेरचे संबंध, मुलांना आई आणि बाबा अशा दोघांचीही माया द्यायची आहे तर मी कितपत पुरी पडणार, कुठे मला त्यांना वेळ द्यायचा, या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागला. मुलांनी हट्ट कधी केले नाहीत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी सोप्या होत गेल्या. मुलुंडला रेल्वे बॉम्बस्फोटात अनघाच्या बाबांना जाऊन येत्या १३ मार्चला दहा वर्षे होतील. आता दहा वर्षे म्हणताना सोपे वाटते, पण त्यातला एकेक दिवस काढणे तेव्हा कठीण होते. मुलांचे शिक्षण, दहावी-बारावीच्या परीक्षा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. चैतन्य तारुण्यात  पदार्पण करीत असताना त्याला काही अडचणी आल्या. तो अनघाशी, माझ्याशी बोलू शकत नव्हता. आतल्या आत गुदमरत होता. मग त्यालाही मोकळं करावं लागलं. माझ्याशी आई म्हणून नको मला मैत्रीण मानून मन मोकळं कर असे सांगत अनेकविध समस्यांमधून मी मार्ग काढत गेले. अनघाला कार्यक्रमांना घेऊन जाणे, चैतन्यचे कॉलेज, माझी शाळा, पुन्हा घरचे बघणे ही सगळी कसरत होती. एक चांगले होते की, अनघाबरोबर मी बाहेर जाताना चैतन्यने पूर्ण घराची जबाबदारी उचलली. त्याच पद्धतीने प्रत्येकाने आपले छंद, आपले करिअर ठरवून त्यात स्वत:ला गुंतवून घेतले. या इतक्या वर्षांमध्ये स्वत:साठी असं काही करायचे राहून गेलंय, असे कित्येकदा वाटले. पण अजून चार-पाच वर्षे मुलांना माझी गरज आहे. त्यानंतर मी त्यांच्या जबाबदारीतून मोकळी होईन आणि मग मला स्वत:ला जे करावसे वाटते, त्यासाठी पूर्ण वेळ देईन. माझ्या अनुभवातून मला एवढंच सांगायचंय की नेहमी सकारात्मक विचार करा, आपल्याला आपली समस्या किती काळ राहील, त्याच्यावर मात कशी करता येईल याचा विचार करून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा, उभे राहण्यासाठी आपल्याला स्वत:लाच विचारपूर्वक, प्रयत्न करावे लागतात.

Story img Loader