लेखक वामन होवाळ यांनी आपण दलित असल्याचे कधीही भांडवल केले नाही की कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही. मला जे देता आले ते मी दिले या भावनेने ते लिहीत राहिले. वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणारी एक मोठी शक्ती त्यांच्या लेखनात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी शनिवारी दादर येथे केले. ‘स्वयंदीप प्रकाशन’ संस्थेने प्रकाशित केलेल्या आणि डॉ. महेश केळुस्कर व डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो यांनी संपादित केलेल्या ‘आरसपानी- वामन होवाळ व्यक्तित्व आणि साहित्य’ या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, कोल्हापूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा किरवले, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. किरवले म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची उर्जा त्यांच्या साहित्यात उमटली आहे तर इनामदार यांनी सांगितले की, होवाळ यांची बांधिलकी माणसाशी असून ती त्यांच्या साहित्यातून नेहमीच जाणवते. कुवळेकर यांनी होवाळ हे माणूसपण जपणारा आणि जागविणारा लेखक असल्याचे सांगितले.
मनोगत व्यक्त करताना होवाळ म्हणाले की, न्यूनगंड टाकून दिल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे बाळकडू मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने भारलेल्या माणसांकडून मिळाले. या प्रेरणेतूनच आपला लेखन प्रवास सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा