दुष्काळाचा मुकाबला शासनाकडून परिश्रमपूर्वक केला जात आहे. पण दुष्काळ ही इष्टापत्ती कशी ठरेल याचा विचार, नियोजन व कृती करावी लागेल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
येथील शाहू सांस्कृतिक सभागृहामध्ये रविवारपासून दोन दिवसीय सरपंच महापरिषदेला सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन पवार यांनी केले. कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, प्रतापराव पवार, श्रीराम पवार आदी उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या सरपंचांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, राज्यात दुष्काळ ही मुख्य समस्या बनलेली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नांची शर्थ करीत आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, औषधे यावर भर देण्यात आला आहे. १ लाख २० हजार पशुधन वाचविण्यासाठी ११० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाने माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्याचा फायदा राज्य शासनाने घ्यावा. राज्याला १२०० कोटी रुपये देण्याचा निर्णय अगोदरच घोषित केला आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आणखी निधी देण्याचा विचार असून राज्य शासनाने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी जयंत पाटील यांना केली. दुष्काळाकडे इष्टापत्ती म्हणून कसे पाहता येईल, याचा विचार होण्याची गरज व्यक्त करून पवार म्हणाले, यानिमित्त काही कामांवर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. पोपटराव पवार यांनी अहमदनगर जिल्ह्य़ामध्ये केलेल्या जलसंधारण कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास हरकत नसावी. दुष्काळामुळे नाले, मोठय़ा नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. त्यातील गाळ उपसा करून सांडव्याची दुरुस्ती केली तरी किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटू शकेल. अशाप्रकारचे काम गुजरात राज्यात प्रभावीपणे झाल्याचा दाखला त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा