नागपूर ते सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या घोषणेला चार वर्षे झाली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव अद्यापही मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात धूळखात पडला आहे. या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे वर्तमान रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार असून मालवाहतूक जलद होऊन परिणामी रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक रेल्वे मंडळाला नाही.
चार वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर ते सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती. या तिसऱ्या रेल्वे मार्गावरून विशेषत: मालगाडय़ा चालविल्या जाणार आहेत. विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा तिसरा रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या नागपूर ते सेवाग्राम दरम्यान अप व डाऊन असे दोन रेल्वे मार्ग आहेत. त्यांच्या क्षमतेचा विचार केला तर अप व डाऊन मार्गाने एकूण ६३ गाडय़ा जायल्या हव्यात. प्रत्यक्षात अप मार्गाने रोज ७२ गाडय़ा धावतात. डाऊन मार्गाने रोज ६९ गाडय़ा धावतात. मालगाडय़ांची संख्या वेगळी. होशंगाबादकडून भुसावळ वा हैद्राबादकडे जाणाऱ्या गाडीला नागपूर, सेवाग्राममार्गेच जावे लागते. प्रवासी गाडय़ांच्या वेळेप्रमाणे मालगाडय़ा थांबवून रवाना केल्या जातात. त्यामुळे मालगाडय़ांच्या वाहतुकीवर आणि उत्पन्नावरही परिणाम होतो आहे.
विदर्भाच्या औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी चार वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर ते सेवाग्राम दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. तेव्हाच ७६ किलोमीटरच्या या तिसऱ्या रेल्वे मार्गाचा प्रस्तावित खर्च ३७६ कोटी रुपये होता. २०१२-१३च्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रस्तावास तसेच २९५ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यास मंजुरी मिळाली. मुख्यत: मालगाडय़ांसाठी हा तिसरा रेल्वे मार्ग होणार होता. डब्यांमध्ये मालाच्या चढ-उतारासाठी सात सायडिंग तयार केल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मुंबईतील रेल्वे मुख्यालयात पाठविला. मुख्यालयाने नागपूरच्या एका खाजगी कंपनीकडून सव्‍‌र्हेक्षण केले. केवळ रेल्वे मार्ग कुठून व कसा घालायचा, एवढेच सव्‍‌र्हेक्षण करून त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. वास्तविक रेल्वे मार्ग कसा आणि कुठल्या जागेवरून घालायचा, या मार्गात किती नद्या, नाले, तलाव येतात, शेतकऱ्यांची किती जमीन अधिग्रहित करावी लागेल, किती उड्डाण पूल भुयारी मार्ग आदींचा लेखा-जोखा तयार करावा लागतो. प्रत्यक्षात हे झालेच नाही.
अर्धवट थातूरमातूर सव्‍‌र्हेक्षण झाले. त्यानंतर काहीच झालेले नाही. तिसऱ्या रेल्वे मार्गाचा हा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील मुख्यालयात धूळखात पडला आहे. अद्यापही त्याचे काहीच झालेले नसून याचा प्रस्तावित खर्च मात्र ५२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुख्यालयातील अधिकाऱ्यांना या तिसऱ्या रेल्वे मार्गाची गरज वाटेनाशी झाली आहे. नागपूर ते सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे मार्गापेक्षाही देशात आणखीही अनेक रेल्वेचे प्रकल्प प्रस्तावित असून त्यातही प्राधान्यातील प्रकल्पांची संख्या मोठी असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत असल्याचे बोलले जाते.
नागपूर ते सेवाग्राम या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे वर्तमान रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार असून मालवाहतूक जलद होऊन रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे. रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्याचे काहीही देणेघेणे नाही, असेच दिसते.
रेल्वेच्या कुठल्याही प्रकल्पास वेळ हा द्यावाच लागतो. मुळात प्रश्न प्रवाशांच्या सुरक्षेचा असतो. हा प्रस्ताव रेंगाळला नसून त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे. विविध प्रक्रिया असतात आणि त्याची निकषांनुसार अंमलबजावणी करावीच लागते. त्याला वेळ लागत असतो, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली.

Story img Loader