भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी यांच्यापाठोपाठ चर्चेच्या आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेला आणि ‘आम’ मधून ‘खास’ झालेला एक ‘आदमी’च्या उद्या मुंबईत येत आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातेत गाजलेल्या रोड शोचा तिसरा अंक उद्या मुंबईत पार पडणार असल्याने मुंबईकरांना त्याचे कुतूहल वाटणे साहजिकच आहे..
ही खास बात आहे, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, अरविंद केजरीवाल यांची! आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत आतापर्यंत तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी केजरीवाल उद्या मुंबईत येतील, रिक्षातून फिरतील, मुंबईच्या लोकल ट्रेनमधून चर्चगेट गाठतील, आणि नंतर आपला रोड शो सादर करतील.. मुंबईत एका आम आदमीप्रमाणे, म्हणजे, सामान्य नागरिकाप्रमाणे वावरण्याचा त्यांचा मनोदय असला, तरी त्यामुळेच ते मुंबईकरांच्या आकर्षणाचे खास केंद्र राहतील याची पुरेपूर दक्षता त्यांच्या पक्षाने घेतली आहे. मुंबईच्या निवडणुकीच्या राजकारणातील उद्याचा दिवस केजरीवाल यांच्याविषयीच्या चर्चेपुरताच केंद्रित राहावा यासाठी आम आदमीचे तमाम कार्यकर्ते टोप्या चढवून कामाला लागले आहेत..
बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता केजरीवाल विमानाने मुंबईच्या भूमीवर पाऊल ठेवतील. अर्थात, विमानतळाबाहेर आम आदमीची हजेरी असेलच.. १० वाजून ४० मिनिटांनी ते विमानतळावरूनच एका ऑटोरिक्षात बसतील, आणि चाकरमानी मुंबईकर ज्या घाईने रेल्वे स्टेशन गाठतो, तश्शाच घाईगडबडीने अंधेरी रेल्वेस्थानकावर दाखल होतील. मागेपुढे कार्यकर्त्यांची गर्दी राहणारच असल्याने, साहजिकच, सकाळी ठरलेली गाडी पकडण्यासाठी स्टेशनकडे धावणारी सारी पावले अंधेरी स्थानकावर काही क्षण थबकतील, कुजबूज करतील, आणि गाडी पकडून केजरीवाल चर्चगेटला रवाना झाले, की फलाटावर मागे राहिलेली गर्दी राजकारणावर चर्चाही करेल..
दिल्लीवर ४९ दिवसांचे राज्य केलेले ‘माजी मुख्यमंत्री’ अरविंद केजरीवाल अंधेरीहून सव्वाअकरा वाजता लोकलने चर्चगेट स्थानकापर्यंत ५० मिनिटांचा प्रवास करतील. त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असल्यामुळे त्यांचा लोकलचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडणार आहे. केजरीवाल यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या उपनगरी गाडय़ांमधील प्रवाशांना आवरण्याची कसरतही त्यांना करावी लागणार, हे उघड आहे. साडेबारा वाजता केजडीवाल यांची पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
केजरीवाल यांच्या मुंबई दौऱ्याचे मुख्य आकर्षण त्यांचे दोन ‘रोड शो’ असणार आहेत. यापैकी पहिला दुपारी ३ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू होईल आणि मौलाना हसरत मोहानी चौक (नागपाडा जंक्शन) मार्गे खिलाफत हाऊसपर्यंत जाऊन सायंकाळी ५ वाजता संपेल. दुसरा रोड शो सायंकाळी साडेपाच वाजता मानखुर्दहून सुरू होईल आणि अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजीनगर सिग्नल, रमाबाई नगर या मार्गाने फिरेल. सायंकाळी ७ वाजता कन्नमवार नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेने त्याची सांगता होईल.
औटघटकेच्या राजाप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद उपभोगले आहे. प्रचार दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रात त्यांची पावले पहिल्यांदाच पडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला तमाम ‘आम आदमी’ किती प्रतिसाद देतात हे उद्या सर्वाना पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा