सव्वाशे वर्षांच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग सुरू
आगामी वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचा सर्व कारभार ‘ऑनलाईन’ पद्धतीने केला जाणार आहे. त्यासाठी १८८५ मध्ये जिल्हा लोकल बोर्ड अस्तित्वात आल्यापासूनचे जिल्हा परिषधेकडे असलेले सर्व रेकॉर्ड स्कॅन करुन त्याचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम)’ ही योजना कार्यान्वित केली आहे.
‘संग्राम’ ऑनलाईन योजनेसाठी आजपासून कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुरु करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, जि. प. कर्मचारी व महाऑनलाईनचे कर्मचारी यांना आजपासून प्रशिक्षण सुरु करण्यात आले. हे सर्वजण जानेवारी अखेर तालुका पातळीवर इतरांना प्रशिक्षण देतील. जिल्ह्य़ातील १ हजार ३१७ म्हणजे सर्व ग्रामपंचायतींना संगणक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यातील केवळ १६२ ग्रामपंचायती ब्रॉडबँडच्या कनेक्टिव्हिटीपासून वंचित आहेत, त्यांना कनेक्टिव्हिटी उपलब्ध व्हावी यासाठी, टॉवर उभारणीसाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला, तोपर्यंत या ग्रामपंचायती नजिकच्या ग्रामपंचायतींच्या संगणकातून माहितीची देवाण-घेवाण करणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर (प्रशासन) यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी उपयुक्त असे ‘ई-पंचायत’ सॉफ्टवेअर उपलब्ध झाले आहे, सन २०११ च्या जनगणनेनुसार सर्व डाटा त्यावर भरला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व रेकॉर्डचे फायलिंग केले जाणार आहे.
केंद्र सरकारने देशभरातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना एकच अकौंटिंग पद्धत ठरवून दिली आहे, त्यानुसार १ जानेवारीपासून नव्या पद्धतीचे अकौंटिंग केले जाणार आहे. त्यासाठी ‘पंचायत राज’ पोर्टल कार्यान्वित केले आहे. येत्या मार्चपर्यंत सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचा कारभार ‘पेपरलेस’ होईल, अशी अपेक्षा भोर यांनी व्यक्त केली.    

Story img Loader