पंचम निषाद या संगीत प्रसारासाठी कार्यरत संस्थेने शनिवार, १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता फाईन आर्ट्स सोसायटी, चेंबूर येथील शिवास्वामी सभागृहामध्ये ‘म्युझिक अ‍ॅण्ड ऱ्हिदम मास्टस’ या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील रामपूर-सहासवान घराण्याचे गायक उस्ताद राशिद खान आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसैन असे दोन दिग्गज प्रथमच मैफलीमध्ये एकत्रितपणे आपली अदाकारी सादर करणार आहेत. या ऐतिहासिक घटनेबरोबरच इमादखानी घराण्याचे सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी हेसुद्धा तब्बल २० वर्षांच्या कालखंडानंतर या मैफलीतील दुसऱ्या सत्रात उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबरोबर वादन करणार आहेत. वादन आणि गायनातील तीन दिग्गजांना एकत्र ऐकण्याची संधी या निमित्ताने मुंबईकर शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. संपर्क – २४१२४७५०

देवदत्त पाडेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘संवेदना’
निसर्ग हाच विषय मुख्यत्वे आपल्या चित्रांतून हाताळणारे देवदत्त पाडेकर यांच्या चित्रांचे ‘संवेदना’ हे प्रदर्शन २२ जानेवारीपासून जहांगीर कला दालनात सुरू होत आहे. निसर्गात स्थिर असे काही नसते. सर्व काही गतिमान आहे. सर्व जीवसृष्टीत हालचाल आहे. बहरलेले झाड असो, पाण्यातील तरंग असो, पानांची सळसळ असो की पक्ष्यांची फडफड असो या साऱ्याबरोबर माणसाचे भावनिक नाते आहे, असे मत असलेले देवदत्त पाडेकर यांनी हे नाते दाखविण्याचा प्रयत्न ‘संवेदना’ या प्रदर्शनांतील चित्रांमधून केला           आहे.
यातील सर्व चित्रे तैलरंग आणि पेस्टल रंग या दोन माध्यमातील आहेत. नैसर्गिक रंगछटांचा प्रभावी वापर, नैसर्गिक आकार आणि मानवाकृती यांची सांगड घातलेली चित्रे यात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन २२ ते २८ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.

ज. द. जोगळेकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
ज्येष्ठ विचारवंत आणि स्वा. सावरकर यांच्या तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक तसेच युद्धशास्त्र, राष्ट्रवाद, इस्लाम, साम्यवाद या विषयांचे अभ्यासक असलेल्या ज. द. जोगळेकर यांच्या ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. नवचैतन्य प्रकाशन आणि धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथजी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन समारंभाचे आयोजन वसंत स्मृती, तिसरा मजला, रणजित स्टुडिओजवळ, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व येथे करण्यात आले आहे.  

राष्ट्रीय मतदाता मंचाचा जाहीर कार्यक्रम
लोकशाही प्रणाली आणि सुयोग्य प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे २५ जानेवारीच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘आघाडय़ांचे राजकारण – सुयोग्य दिशा’ या विषयावर जाहीर कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर सभागृह, डी. एल. वैद्य मार्ग, दादर पश्चिम येथे करण्यात आले आहे.
पुढील १०-१५ वर्षांत आघाडय़ांच्या राजकारणाला पर्याय नाही असे मानले जाते आहे. समाजात या विषयावर चर्चा व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ पत्रकार व खासदार भारतकुमार राऊत आणि न्यूज भारतीचे संपादक अरूण करमरकर वक्ते असतील. संपर्क – ९८६९००९४०९ (अजित शेणॉय), ९८१९०९३००८ (प्रा. रत्नाकर कामत).