विदर्भातील दुष्काळी गाव. गावात रोजगार नाही. शिक्षण कमी. त्यामुळे नाइलाजाने गाव सोडला. पोटापाण्यासाठी मुंबई गाठलं. तिथलं वातावरण भावलं नाही. इकडेतिकडे भटकत राहिलो. नाशिकरोड स्टेशन दिसलं. म्हटलं चला कविवर्य तात्यासाहेबांच्या गावात. कुठलीही पुंजी हाताशी नव्हती. तरी या गावाने मला सांभाळलं. हॉटेलमध्ये काम केलं. पडेल ते काम करताना कविता, साहित्याने मोठा आधार दिला. तो खुंटा भक्कम धरून ठेवला. कवितेच्या संगतीने जीवनाचा लळा लागला. कविता लिहित राहिलो. चांगली नोकरी मिळाली. कुटुंब केलं. हे सर्व एका कवितेमुळे घडलं..
सुभाष अक्कावार यांनी मनोगतात त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात मांडला, तेव्हा उपस्थितांना त्यांच्या जिद्दीला दाद द्यावीशी वाटली. येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयात ‘कविवेवर बोलू काही’ या कार्यक्रमात अक्कावार यांची कवयित्री जयश्री वाघ यांनी मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान अक्कावार यांनी जीवनातील चढ-उतार सांगितले. कवितेने कशी प्रत्येक वळणावर साथ केली, तेही मांडले.
व्यासपीठावर वाचनालयाचे सचिव हेमंत पोतदार होते. प्रांजली चंद्रात्रे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विवेक उगलमुगले यांनी केले. आभार मधुरा फाटक यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा