‘महापंचायती’च्या राज्यातील पहिल्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सर्वसामान्य माणसांचे प्रश्न व त्यांच्या समस्या कमी वेळेत आणि कमी त्रासात सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अव्याहतपणे काम करीत असते. असे असले तरी एखादे काम विविध विभागांशी संबंधित असल्याने अशा कामांसाठी बराच वेळ जातो. घाटंजी येथे दर महिन्याला होणाऱ्या महापंचायतीच्या माध्यमातून ही सर्व कामे एकाच ठिकाणी, एकाच वेळी होणार असल्याने ही महांपचायत सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारी ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
घाटंजी येथे दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी भरणाऱ्या महापंचायतीचे उद्घाटन मोघे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वामनराव कासावार, विभागीय आयुक्त डी.आर. बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, सोनबा मंगाम, पत्रकार न.मा. जोशी, नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, शंकर बढे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य माणसांचे प्रश्न एकत्रित आल्यास ते सोडविणे सोपे होते. त्यामुळे समस्या सोडविण्यासोबतच प्रशासनाच्या दृष्टीने महापंचायत अतिशय जुनी आहे. पूर्वी गावांमध्ये याच माध्यमातून समस्या सोडविल्या जायच्या. आपसात सामोपचाराचे वातावरण निर्माण करण्यासाठी पंचायत अतिशय उपयुक्त ठरते. घाटंजी येथील या महापंचायतीची चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी आयुक्त बन्सोड म्हणाले, महापंचायतीचा उपक्रम अतिशय चांगला असून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांसाठी योग्य लाभार्थी निवडण्यासाठी महापंचायतीची मदत होईल. नागरिकांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
यावेळी आमदार वामनराव कासावार, न.मा. जोशी, नवलकिशोर राम, रंजनकुमार शर्मा आदी मान्यवरांची भाषणे झाली. सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य व महापंचायतीने निमंत्रक देवानंद पवार यांनी महापंचायतीची भूमिका विषद केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापंचायतीच्या संकल्प पुस्तिकेचे प्रकाशन तसेच संकेतस्थळाचे उदघाटन झाले. या पहिल्याच महापंचायतीला घाटंजी शहरासह तालुक्यातील असंख्य नागरिक आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद बाविस्कर यांनी केले.