गतवर्षीच्या स्वप्नभंगामुळे ठाणेकर अपेक्षाहीनच
ठाणे शहरातील वाहतुकीसाठी लाइट रेल ट्रान्झीट प्रकल्प (एलआरटी), येऊर जंगलात पर्यटन केंद्राचा विकास, पूर्व द्रुतगती महामार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, खाडी किनाऱ्याचा विकास, श्ॉलो पार्क, अंतर्गत वाहतुकीसाठी श्री स्थानक लोकमार्ग प्रकल्प अशा एकाहून एक बडय़ा प्रकल्पांची घोषणा करत ठाणेकरांना स्वप्नांच्या जगात नेऊन ठेवणारा माजी आयुक्त आर.ए.राजीव यांचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प केवळ फुकाची बडबड ठरल्याचे वर्षभरानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. आता जुनेच आणि कागदावर स्वप्नवत वाटणाऱ्या प्रकल्पांचा साधा कागदही वर्षभरात हलला नसल्याने विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांच्यामार्फत मंगळवारी सादर होणाऱ्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाविषयी फारशी आशा बाळगणे धाडसाचे ठरणार आहे.
 यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आयुक्त असीम गुप्ता यांनी विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाची अंमलबजावणीची शक्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करत आणली असून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सुधारणांचा प्रकल्पही हाती घेतला आहे.
मोठमोठय़ा प्रकल्पांचा रतीब मांडत राजीव यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.  त्यानंतर दोन महिन्यांत त्यांची बदली झाली. राजीव यांनी कागदावर सादर केलेले अनेक प्रकल्प अव्यवहार्य असल्याचा साक्षात्कार आता महापालिका प्रशासनाला होऊ लागला असून गोखले मार्गापासून रेल्वे स्थानकापर्यंतचा भुयारी मार्गाचा प्रकल्प तर अभियांत्रिकी विभागाला गुंडाळावा लागला आहे.
याशिवाय वर्तकनगर परिसरात २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प आणि जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या काही जुन्याच रखडलेल्या कामांची पुन्हा सुरुवात करण्यात गुप्ता यांना यश मिळाले आहे. याशिवाय शहरातील सर्व थरातील विकसकांच्या प्रकल्पांना बांधकाम परवानगी देण्याचा धडाका गुप्ता यांनी लावला असला तरी आर.ए.राजीव यांच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांची अंमलबजावणी करण्याविषयी गुप्ता फारसे उत्सुक दिसले नाहीत.
रस्ते, वाहनतळ, २४ तास पाणी सगळेच कागदावर..
मोठय़ा विकासकामांचे सूतोवाच करत असताना राजीव यांनी गेल्यावर्षी विकास आराखडय़ात समावेश करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे कागदावरच राहिली आहेत. घोडबंदर, कळवा, खारेगाव, कौसा, शीळ यांसारख्या भागात विकास आराखडय़ात समावेश करण्यात आलेल्या रस्त्यांचा विकास करण्याची घोषणा राजीव यांनी केली होती.
यापैकी काही तुरळक अपवाद वगळले तर बऱ्याचशा कामांचे साधे अंदाजपत्रकही तयार करण्यात महापालिकेस यश आलेले नाही. महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात वाहनतळांचे एक धोरण यापूर्वीच मंजूर केले असले तरी ते प्रत्यक्षात आणणे अद्याप जमलेले नाही. शहरातील वेगवेगळ्या भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेची घोषणा नव्या वर्षांत अमलात येईल, अशी आशा वरिष्ठ अभियंते व्यक्त करत आहेत.
मोठे प्रकल्प सल्लागारांच्या प्रतीक्षेत
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी श्री स्थानक लोकमार्ग प्रकल्पाची घोषणा राजीव यांनी केली होती. हा प्रकल्प नेमका कसा असेल याविषयी वर्ष उलटले तरी पुरेशी स्पष्टता नसल्याचे चित्र दिसत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ते घोडबंदर मार्गावर लाइट रेल ट्रान्सपोर्टची घोषणा झाली होती.
या प्रकल्पासाठी साधा सल्लागारही नेमण्यात आलेला नाही. ठाण्याच्या खाडीकिनारी १९ किलोमीटर अंतराचा बायपास, संजय गांधी उद्यानापर्यंत १२ किलोमीटरचा निसर्गरम्य रस्ता हे प्रकल्पही सल्लागाराच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मत्स्यालय, हेलियम बलून हे पर्यटनविषयकचे प्रकल्प म्हणजे केवळ फुकाची बडबड आहे हे एव्हाना ठाणेकरांच्या लक्षात येऊ लागले आहे.
 गेल्या वर्षी घोषणा झाल्याप्रमाणे कळवा परिसरात नवे नाटय़गह उभारण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविल्याने यंदाच्या वर्षांत हे काम सुरू होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

मोठे प्रकल्प कागदावर
ा    अंतर्गत वाहतुकीच्या पर्यायांसाठी
‘श्री स्थानक लोकमार्ग प्रकल्प’
ा    ठाण्याच्या खाडीकिनारी १९ किमीचा बायपास मार्ग
ा    रेल्वे स्थानक ते गोखले रोड
भुयारी मार्ग
ा    जागतिक दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणी
ा    अनुदान आणि कर्जाद्वारे ६२७ कोटी रुपये उभारणार
ा    ‘सेव्ह नॅशनल पार्क’ प्रकल्पातून
१२ किमीचा निसर्गरम्य रस्ता

Story img Loader