नागपूर जिल्ह्य़ात गुणवंत अन् कॉपीबहाद्दरही जास्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेले कॉपीचे प्रमाण बघता निकालाची टक्केवारी वाढली असल्याची चर्चा मंडळ परिसरात होती. यावेळी सर्वाधिक कॉपीची प्रकरणे गडचिरोलीत उघडकीस आलेली असताना त्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८४.३८ टक्के लागला. दरवर्षी गोंदिया जिल्हा कॉपी आणि निकालात आघाडीवर असताना यावेळी गोंदिया कॉपीमध्ये चौथ्या स्थानावर, तर निकालात पहिले स्थान कायम ठेवले आहे.
यावेळी बारावीच्या परीक्षेत ३२६ विद्यार्थ्यांंना कॉपी प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर त्यात सर्वात जास्त गडचिरोलीत ८९, नागपूर ६९, गोंदिया ४८, वर्धा ४९ चंद्रपूर ४१ आणि भंडारामध्ये २६ विद्याथ्यार्ंना कॉपी करताना पकडण्यात आले होते. गेल्या चार वर्षांतील या गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्य़ातील टक्कवारी बघता जिल्ह्य़ात गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी अन्य जिल्ह्य़ांपेक्षा जास्त आणि कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांचीही संख्या जास्त असल्यामुळे या तीनही जिल्ह्य़ाच्या निकालाबाबत शिक्षणक्षेत्रात संशयाचे वातावरण निर्माण होत असताना यावेळी मात्र गडचिरोली आणि नागपूर कॉपीमध्ये आघाडीवर आहे. असे असले तरी यावर्षी नागपूर, वर्धा, नागपूर, गोोंदिया, गडचिरोली जिल्ह्य़ातील परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार मोठय़ा प्रमाणात आढळून आले. मात्र, काही केंद्राधिकाऱ्यांनी आधीच विद्यार्थ्यांना सतर्क केल्याने कॉपीचे प्रकार उघडकीस आले नसल्याची माहिती भंडाऱ्यातील एका शिक्षकाने दिली. विशेषत भंडारा व गोंदियातील ज्या शाळांमध्ये सर्वात जास्त कॉपीबहाद्दर पकडण्यात आले होते त्या सर्व शाळा राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गोंदियाचा निकाल जास्त लागण्यामागे त्या भागात मंडळ सदस्य आणि स्थानिक राजकीय पक्षनेत्यांचा दबाव असल्याचे बोलले जाते. गोंदियात मोठय़ा प्रमाणात कॉपीबहाद्दर पकडण्यात आलेले असताना ते उघडकीस येऊ नये, यासाठी काही अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या संदर्भात मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी सांगितले, कॉपीचा आणि त्या-त्या जिल्ह्य़ाच्या निकालाचा टक्केवारीचा काहीही संबंध नाही. उलट, भंडारा आणि गोंदियात कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी मंडळाने बरेच प्रयत्न केले आहेत. यावर्षी राज्याचा निकाल वाढला आहे. गेल्या वर्षभरात कॉपी संदर्भात मोठय़ा प्रमाणात शाळा आणि मंडळातर्फे विद्यार्थ्यांंमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून निकालाची टक्केवारी वाढल्याचा दावा पारधी यांनी केला. गोंदिया जिल्ह्य़ात सामूहिक कॉपीची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भरारी आणि बैठे पथक असल्यामुळे कॉपीला आळा बसला.
गोंदिया जिल्ह्य़ाचा निकाल दरवर्षी चांगला लागतो त्यामुळे केवळ त्या जिल्ह्य़ावर टीका करणे योग्य नाही. नागपूर विभागात ३२६ प्रकरणे उघडकीस आली असताना त्यातील ३२१ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले.

Story img Loader