थंडीविना यंदाची दिवाळी गेल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात झपाटय़ाने बदल होत असून सध्या अचानक निर्माण झालेला कमालीचा गारवा हे त्याचे निदर्शक. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये तापमानाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याने यंदा हिवाळ्याचा बाज काही औरच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. गारव्याचे तीव्रतेने आगमन झाल्यामुळे सर्वसामान्यांना गुलाबी थंडीचा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे. सलग तीन दिवसांपासून आठ अंश सेल्सिअसच्या आसपास रेंगाळणाऱ्या तापमानात चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी फारसा फरक पडला नाही. आदल्या दिवशीच्या तुलनेत त्यात काहिशी वाढ होऊन ते ८.४ अंशावर पोहोचले. परंतु, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोंदले गेलेले ९.९ अंश सेल्सिअस हे नीचांकी तापमान यंदा नोव्हेंबरच्या पूर्वार्धानंतर मागे पडले आहे. या दोन्ही वर्षांतील तापमानाचा आलेख पाहिल्यास यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवत असल्याचे लक्षात येते. यामुळे नेहमीपेक्षा यंदाचा हिवाळ्याचा हंगाम उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळा ठरला असून या वर्षी सर्वाधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे.
दिवाळीपूर्वीच सुरू झालेल्या थंडीने गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेपर्यंत नीचांकी नोंद केली होती. गेल्या चार ते पाच वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास ही नोंद प्रामुख्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झालेली दिसते. यंदा नोव्हेंबरच्या मध्यावरच ही पातळी गाठली गेल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दोन ते अडीच महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती आहे. नाशिकप्रमाणे धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभापासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा हळूहळू कमी होत होता. परंतु, नेहमी या पद्धतीने वातावरणात बदल होत असल्याने सर्वसामान्यांना त्यात फार काही विशेष असे वाटले नाही. दिवाळीनंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्या शनिवारी तापमानात अचानक बदल झाले. या दिवशी नाशिकमध्ये ८.९ अंशाची नोंद झाली. त्यानंतर रविवारी ८.१, सोमवारी ८.३, मंगळवारी ८.० अंश सेल्सिअस असे तापमान नोंदले गेले. एरवी, तापमानाची ही पातळी डिसेंबरमध्ये अथवा त्यापुढील महिन्यात गाठली जाते
यंदा थंडीचे नेहमीपेक्षा लवकर आगमन झाल्याची बाब मागील वर्षीच्या तापमानाची आकडेवारी पाहिल्यास ही बाब लक्षात येऊ शकते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात १७ ते २१ नोव्हेंबर या काळात तापमानाची पातळी १०.०० ते ११.०० अंशादरम्यान राहिली होती. त्यावेळी २३ तारखेला ९.९ या नीचांकी तापमानाची नोंद झाली. यावर्षी सलग चार दिवस त्याहून कमी तापमानाची नोंद झाली आहे. आकाश निरभ्र असल्याने आणि आद्र्रतेचे प्रमाणही कमी झाल्यामुळे तापमानाची पातळी खाली आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. यामुळे सध्या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीची प्रचिती येत आहे. मालेगाव, धुळे व नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात थोडय़ा-फार फरकाने अशीच स्थिती आहे. जळगावकरांमध्ये तापमानाच्या नोंदींविषयी संभ्रम असतो. कारण, जळगाव व भुसावळच्या तापमानात चार ते पाच अंशांची तफावत आढळून येत असल्याने नेमके तापमान काय याचा अंदाज कुणाला बांधता येत नाही. जळगावमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या केंद्रात तसेच भुसावळ येथे केंद्रीय जल आयोगामार्फत नोंद घेतली जाते. या दोन्ही केंद्राच्या नोंदीतील फरक सर्वसामान्यांचा गोंधळ वाढवितो, असा आजवरचा अनुभव आहे.
दिवाळीनंतर भरून राहिलेल्या गारव्याने कपाटात असणारे उबदार कपडे बाहेर काढणेही भाग पडले आहे. पुढील किमान दोन ते अडीच महिने अशी अनुभूती मिळण्याची शक्यता असल्याने हा हंगाम नेहमीपेक्षा वेगळा ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा