दहावीचा निकाल लांबल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीचे वर्ग यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे १५ दिवस उशीराने सुरू होणार आहेत. वर्ग उशीरा सुरू झाल्यास त्याचा परिणाम वर्षभराच्या अभ्यासाच्या वेळापत्रकावर होतो. दोन वर्षांपूर्वी या कारणामुळे महाविद्यालयांना पहिल्या सत्रात केवळ एकच चाचणी परीक्षा घ्यावी लागली होती. यंदाही वर्ग उशीराने सुरू होत असल्याने परीक्षांचे नियोजन करताना कनिष्ठ महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विघ्न न आल्यास यंदा अकरावीचे वर्ग २० जुलैपर्यंत सुरू होतील, अशी अपेक्षा मुंबईचे शिक्षण उपसंचालक न. बा. चव्हाण यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवडय़ातच अकरावीचे वर्ग सुरू झाले होते. तत्पूर्वी म्हणजे २०१२पर्यंत विनाकारण रेंगाळणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे वर्ग सुरू होईस्तोवर ऑगस्ट उजाडत असे. कारण अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांना साधारणपणे ९० दिवस लागत. गेल्या वर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आटोपशीर करण्यात आल्याने ते २५ दिवसांत संपले. तसेच, गेल्या वर्षी दहावीचा निकालही आधीच्या वर्षांच्या तुलनेत चार दिवस आधी म्हणजे ७ जूनला जाहीर झाला होता. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ातच अकरावीचे वर्ग महाविद्यालयांना सुरू करता आले होते.
यंदा दहावीचा निकालच मुळात दोन आठवडय़ांनी लांबला आहे. त्यामुळे, १८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या (मुंबई महानगर क्षेत्रातील) या भागातील महाविद्यालयांमधील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तिसऱ्या आणि शेवटच्या यादीनंतर बहुतांश महाविद्यालयांमधील ९९ टक्के प्रवेश झालेले असतात. त्यामुळे, तिसऱ्या यादीचे प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.

Story img Loader