मार्चच्या मध्यंतरापासून उन्हाळ्याच्या झळा वाहायला सुरुवात झाली असून चंद्रपूर शहरात ३८ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यावर्षी हिवाळ्याची थंडी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कायम होती. आजही पहाटे सहा वाजता वातावरणात थंडी, ओलावा आणि गारवा असतो, परंतु मार्चच्या मध्यान्हापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात झालेली आहे. पहाटे थोडी थंडी वाटत असली तरी सकाळी ८.३० वाजतापासून कडक उन्हाला सुरुवात होते. चंद्रपूर कडक उन्हाळ्यासाठी देशभरात प्रसिध्द आहे. उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात या शहरातील तापमानाचा पारा कायम ४५ अंश सेल्सिअस असतो. सध्या मार्च महिना सुरू असला तरी तापमान ३८ अंशापर्यंत पोहोचले आहे. याचाच अर्थ, यंदाही कडक उन्हाळा पडणार असल्याचे हवामान खात्यातील जाणकारांचे मत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आतापासूनच शीतपेय, आईस्क्रीम पार्लर्स, चौका चौकात लस्सी सेंटर, ऊसाच्या रसांचे ठेले व पाणपोई सुरू झालेली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतांनाच रस्त्यांवरील गर्दीही कमी होत चालली आहे. दहावी व बारावीची परीक्षा आटोपल्याने रस्त्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुल-मुलांची गर्दीही कमी झाली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हामुळे रस्ते आतापासूनच ओस पडलेले दिसत आहेत. शहरातील बाजारपेठा थंडावल्या आहेत. उन्हामुळे घरोघरी कुलर, एसी व वातानुकूलित यंत्रणा सुरू झालेली बघायला मिळत आहे. शहरातील चौकात कुलरसाठी लागणारा खस व नव्या कुलरची दुकाने मोठय़ा प्रमाणात सुरू झालेली दिसत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी, वीज केंद्र व पोलाद उद्योगांमुळे शहरात प्रदूषणासोबतच उन्हाची तीव्रता यावर्षी अधिक जाणवणार आहे. त्याला कारण शहरातील रस्त्यांचे काम सुरू असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे यावर्षी लोकांना तीव्र उन्हासोबत धुळीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
यंदाही चंद्रपुरात पारा ४५ अंशावरच जाणार
मार्चच्या मध्यंतरापासून उन्हाळ्याच्या झळा वाहायला सुरुवात झाली असून चंद्रपूर शहरात ३८ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावर्षी हिवाळ्याची थंडी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत कायम होती.
First published on: 19-03-2013 at 02:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year also temperature of chandrapur at 45 degrees