‘विवाहानंतर मी बेगम म्हणून माझ्यात बदल घडवून आणला आहे आणि हीच सैफसाठी व्हॅलेन्टाईन डेसाठीची माझी मोठी भेट आहे. आता व्हॅलेन्टाईनसाठी भेट देण्याची पाळी त्याच्यावर आहे. बघूया त्याच्याकडून मला काय भेट मिळणार. माझ्यापुरती बोलायचे झाले तर यावर्षी व्हॅलेन्टाईन डेला अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि प्रकाश झा असे दिग्गज माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे निश्चितच माझा व्हॅलेन्टाईन कोणाहीपेक्षा चांगलाच असणार आहे’, अशा गप्पागोष्टी करत करीनाने उपस्थितांची मने जिंकली. ‘स्टाईल डायरी ऑफ बॉलिवुड दिवा’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने करीना बोलत होती.
बॉलिवुडमध्ये सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणून करीनाची गणना होते. स्टायलिश राहण्यासंदर्भातील आपल्या टिप्स, त्यासंबंधीचे विचार आणि अनुभव करीनाने या पुस्तकाच्या माध्यमातून मांडावेत, अशी कल्पना प्रसिध्द लेखिका शोभा डे यांनी तिच्याकडे मांडली होती. त्यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर आपल्यासाठी हे फार मोठे कौतुक आहे, असे मला वाटले. आणि मग या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली धडपडही पोहोचायला हवी, असा विचार मनात पक्का झाला. त्यातून हे पुस्तक आकाराला आले, अशी माहिती करीनाने यावेळी बोलताना दिली. स्टाईल डायरी लिहिणारी करीना ही बॉलिवुडची पहिली अभिनेत्री ठरली आहे. ‘स्टाईल डायरी ऑफ बॉलिवुड दिवा’ हे पुस्तक लेखिका रॉशेल पिंटो हिने लिहिले असून स्वत करीनानेही लेखनासाठी सहाय्य केले आहे. पेंग्विन इंडिया प्रकाशन आणि शोभा डे बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.  
माझी स्टाईल डायरी १४ वर्षांच्या मुला-मुलींपासून पस्तिशीपर्यंतच्या सर्वाना वाचता येईल, उपयुक्त ठरेल अशा पध्दतीनेच हे लेखन करण्यात आले आहे. पण, स्वत सैफ चाळीशीच्या वर असल्याने आता त्या वयोगटातील लोकांसाठीही काहीतरी लेखन करायला हवे, असे आपल्याला वाटू लागल्याचेही करीनाने यावेळी सांगितले. करीनाने पुन्हा एकदा करण जोहरच्या चित्रपटासाठी वजन कमी केले असून सध्या ती प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year amitabh ajay devgan and praksh jha are my valentine karina kapoor