युरोपियन महासंघाने १ मेपासून घातलेल्या हापूस आंब्याच्या युरोपवारी बंदी मुळे दरवर्षी मुंबईतील हिरेव्यापाऱ्याकडून परदेशात देण्यात येणाऱ्या हापूस आंब्याच्या गिफ्टवरदेखील परिणाम होणार असून युरोपमधील हिरेव्यापारी आणि ग्राहक या भेटीला मुकणार आहेत.
खऱ्या हिऱ्यांच्या शोधात असणारे हिरेव्यापाऱ्यांनी भेटीसाठी निवडलेल्या उच्च दर्जाच्या हापूसच्या दरवर्षी सुमारे २५ हजार पेटय़ा युरोपमध्ये निर्यात होत असतात. फळांचा राजा असलेला हापूस आंबा अलीकडे भेट म्हणून देण्याची प्रथा सुरू झाली आहे. दिवाळीत मिठाई खराब होत असल्याने ती न देता ड्रायफ्रूट देण्याच्या प्रकारात ज्याप्रमाणे वाढ झाली आहे. त्याप्रमाणे उन्हाळ्याच्या या दिवसात कॉर्पोरेट जगतातील ऋणानुबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने सध्या हापूस आंब्याच्या पेटय़ा दिल्या जात आहेत. मुंबईतील हिरेव्यापाऱ्यांचा फार मोठा उद्योग युरोपमधील देशांशी निगडित आहे. त्यामुळे कोकणातील विशेषत: देवगड-रत्नागिरीतील उच्च दर्जाचा सेंद्रिय खतावर पिकविण्यात येणारा हापूस आंबा भेट देण्याचा सिलसिला गेली काही वर्षे सुरू झाला होता, मात्र युरोपियन महासंघाने हापूस आंब्यात आढळणाऱ्या किटाणूंमुळे १ मेपासून हापूससह पाच भाज्यांना बंदी घातली आहे. ती उठविण्यात यावी म्हणून अपेडाचे एक शिष्टमंडळ युरोपवारीदेखील करून आले पण युरोपियन महासंघाने दोन वर्षे घातलेली ही बंदी उठविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय हापूस आंबा निर्यातदारांचे फार मोठे नुकसान होणार आहे.
दरवर्षी सुमारे ३५ कोटी रुपयांचा हापूस आंबा इंग्लंड-युरोपमध्ये निर्यात होत असून युरोपमधील हा आकडा १०० कोटींच्या घरात आहे. मे महिन्यात कोकणातील हापूस आंब्याची खऱ्या अर्थाने आवक मानली जाते. एप्रिल-मेमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे हापूस आंबा लवकर पिकतो आणि त्यात अवीट अशी गोडी निर्माण होते. तोच आंबा युरोपात भेट म्हणून पाठविण्याची मुंबईतील हिरेव्यापाऱ्यांची प्रथा आहे पण नेमका याच काळात हापूस आंब्याला बंदी घालण्यात आल्याने युरोप मधील हिरेग्राहक व व्यापारी यंदा हापूस आंब्याच्या भेटीला मुकणार आहेत. सुमारे २५ हजार पेटय़ा हापूस आंबा भेट स्वरूपात युरोपमध्ये निर्यात होत असल्याचे फळ संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. हापूस आंब्याची ही भेट युरोपप्रमाणे आखाती तसेच आशियाई देशातदेखील पाठवली जाते. अलीकडे भारतात अशी भेट देण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे चांगल्या व काल्टर मुक्त हापूस आंब्याच्या पेटय़ांना कॉर्पोरेट जगतात मोठी मागणी आहे.

Story img Loader