जयसिंगपूर येथे होणाऱ्या यंदाच्या राजर्षी शाहू महोत्सवामध्ये हिंदी, मराठी चित्रपटातील नामांकित कलाकारांचा समावेश आहे. यावर्षीचा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संगीतकार अजय-अतुल यांना तर राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार अभिनेत्री केतकी माटेगावकर यांना जाहीर झाला आहे. १९ व २० जानेवारीला दसरा चौक स्टेडियम मध्ये होणारा हा कार्यक्रम ‘लेक वाचवा अभियानाला’ समर्पित केला आहे, अशी माहिती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाचे संस्थापक मिलिंद शिंदे, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने ‘लेक वाचवा’ विषयावरील रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये चित्ररथाचा समावेश असणार आहे. त्यानंतर वैयक्तिक व सांघिक नृत्य स्पर्धा होणार आहेत. रात्री ८ वाजता अजय-अतुल व केतकी माटेगावकर यांना पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी मला सासू हवी मालिकेतील अभिनेत्री आसावरी जोशी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ.सा.रे.पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, पंचायत समिती सदस्य बाबुराव पाटील यांची उपस्थिती आहे.
२० जानेवारीला सायंकाळी होणाऱ्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात मंगेश बोरगांवकर, आनंदी जोशी, नचिकेत देसाई, सई टेंबे यांचा सहभाग आहे. तर रात्री ९ वाजता अभिनेता सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी, महिमा चौधरी, मुग्धा गोडसे, गायक कुणाल गांजावाला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. ‘लोकराजा’या विशेष अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. यावर्षी रौप्यमहोत्सवी महोत्सवाचे वर्ष असून रिन्यूग्रीन एनर्जी हे मुख्य व डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम हे सहप्रायोजक आहेत. पत्रकार परिषदेस महोत्सव सल्लागार समितीचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, कार्यवाह राजेंद्र झेले, शिवाजी कुंभार, दगडू माने, अर्चना संकपाळ उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा