प्रत्येकाला इतिहास असतो. जो स्वत:चा इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे हा विषय शिकला पाहिजे, असे मत येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. स्नेहल सोनवणे यांनी मांडले. इतिहासापासून राजकारण न करता समाजकारण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शहरातील जी. डी. सावंत महाविद्यालयात इतिहास विभागातंर्गत इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
इतिहास हा विषय का शिकला पाहिजे हे शिवाजी महाराजांच्या चारित्रातील उदाहरणे देत डॉ. सोनवणे यांनी पटवून दिले. बिनभिंतींच्या शाळेत हा विषय शिकता आला पाहिजे. केवळ उद्घाटन करून न थांबता युवा अभ्यासकांसाठी यात अनेक संधी आहेत. पेशवे दप्तर, मुंबई पुराभिलेख यांसारख्या संस्थांसह मोडी लिपी अशा अभ्यासकांची वाट पहात आहे. अभ्यासाची जिज्ञासा असली पाहिजे आणि योग्य तो अन्वयार्थही लावता आला पाहिजे. विविध भाषा आल्या तरच आपण या विषयामध्ये कारकीर्द घडवू शकतो असे मत त्यांनी मांडले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आय. पठाण यांनी भूतकाळातील घटनेचे वर्तमान काळातील संदर्भ लावून भविष्य काळाचा वेध घेणारा विषय म्हणजे इतिहास होय, अशी व्याख्या केली. इतिहास हा विषय मनोरंजक आहे. कारण आपल्यासमोर असलेला इतिहास हा अधिक गौरवीकरण केलेला इतिहास आहे. पण आपणाला योग्य आणि अयोग्य काय समजण्यास अभ्यास मंडळामुळे मार्गदर्शन होते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा. के. व्ही. शेंडे हे उपस्थित होते. इतिहास विभाग प्रमुख प्रा. एम. ए. सानप यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाचा हेतू व स्वरुप स्पष्ट करून इतिहास विभागांतर्गत कोणकोणते उपक्रम राबविले आहेत आणि पुढे कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत हे स्पष्ट केले. सूत्रसंचालन धीरज मोरे यांनी केले. आभार प्रा. आकाश पवार यांनी मानले.