लहान मुलांसाठी कोणीही नाटक लिहू शकतो, हा समज चुकीचा आहे. या मुलांसाठी लेखन करताना ते अत्यंत संस्कारक्षम आणि विचारपूर्वक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी नुकतेच दादर येथे केले.
नवचैतन्य प्रकाशन आणि रुपारेल महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मतकरी यांच्या ‘रसगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी मतकरी यांची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
आजच्या तरुण पिढीला अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी घाई किंवा गडबड करू नये. आधी आवडत्या विषयाचे ज्ञान पूर्णपणे मिळवावे आणि त्यानंतर करिअरचा विचार करावा, असा सल्लाही मतकरी यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. सुधा जोशी यांनी या वेळी मतकरी यांच्या समग्र वाङ्मयाचा आढावा घेतला. तर पत्रकार मुकुंद कुळे यांनी हे पुस्तक संपादन करताना आलेले अनुभव सांगितले. चित्रकार सतीश भावसार, नवचैतन्य प्रकाशनाचे शरद मराठे यांचीही भाषणे झाली. वाङ्मय मंडळाच्या प्रा. वैशाली जावडेकर यांनी प्रास्ताविक केले तर अनघा मांडवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Story img Loader