‘बम बम भोले..’च्या गजरात गुरुवारी भल्या पहाटेपासून त्र्यंबकेश्वरसह नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील विविध शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यानिमित्त बहुतांश मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिरात पहाटे तीनपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पूर्व दरवाजात लोखंडी जाळ्या व मंडप टाकून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली. ही व्यवस्था अपुरी पडल्याने स्वामी समर्थ केंद्राजवळील निरंजनी आखाडय़ापर्यंत भक्तांची रांग होती. स्थानिक दर्शनार्थी, अभिषेक पूजा करणाऱ्यांची पश्चिम दरवाजातून सोय केली तर विशेष दर्शन उत्तर दरवाजातून सुरू होते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाशिक येथील कलावंतांनी विविध भक्तीगीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता श्रींचा सुवर्ण मुखवटा सजविलेल्या पालखीतून मंदिर, पांचआळीतून कुशावर्त तीर्थावर अभिषेक पूजेसाठी नेण्यात आला. यावेळी पालखी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. बेलफळे, बिल्वपत्रे यासह कवठ आदींची दुकाने ठिकठिकाणी थाटलेली होती. पालखी परतल्यानंतर सायंकाळपासून अभिषेक पूजेसह भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले. भाविकांसाठी मोफत चहापान, फराळाचे पदार्थ आदींची व्यवस्था दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थाकडून करण्यात आली. परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडून भाविकांना प्रवास सुखद केला. दरम्यान, कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. शिवाय, पोलीस फौजफाटाही मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आला होता.
त्र्यंबकेश्वर प्रमाणे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. नाशिक शहरातील श्रीकपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर आदी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले. पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटे श्रींना अभिषेक करण्यात आला. सायंकाळी श्री कपालेश्वर महादेवाची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी दक्षिण दरवाजाने प्रवेश देण्यात आला तसेच दर्शनानंतर उत्तर दरवाजाने बाहेर जाण्याची सुविधा करण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या उभारण्यात आल्या होत्या. नवीन आडगाव नाका येथील मनकामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अभिषेक झाल्यानंतर दुपारी
पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोहळ्यात आदिवासी नृत्यासह, ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी ताल धरला. प्रजापिता ब्रह्मकुमारी
ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने म्हसरूळ येथील ‘प्रभुप्रासाद’ सभागृहात शिवध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, नगरसेवक गणेश चव्हाण, डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते. गंगापूर रस्त्यावरील सोमेश्वर मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांची चैतन्य प्रतिकृती, पथनाटय़, चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे, जळगाव व नंदुरबार येथील शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा