* जुन्या घोषणांचा रतीब
* कर्जाच्या डोलाऱ्यावर आर्थिक नियोजन
* गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट अपूर्णच
* आयटी पार्क उभारण्याची घोषणा
* आरोग्यासाठी भरीव तरतूद
* मार्चपर्यंत २४ तास पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट

वर्षांनुवर्षे केवळ कागदावर राहिलेल्या जुन्याच प्रकल्पांची नव्याने घोषणा करणारा आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच इतर वित्तीय संस्थांकडून अपेक्षित धरण्यात आलेल्या कोटय़वधी रुपयांच्या डोलाऱ्यावर उभा राहिलेला नवी मुंबई महापालिकेचा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी बुधवारी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांना सादर केला. आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील आपला अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना भास्करराव नियोजनाच्या आघाडीवर महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात उत्पन्नाचे अवाच्यासवा असे आकडे आणि गेल्या वर्षांत कर्ज-अनुदान मिळवताना झालेली दमछाक पाहाता यावर्षीचा अर्थसंकल्पही फसवा ठरण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या वर्षी भास्कर वानखेडे यांनी २२०० कोटी रुपयांचा जमा-खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात १५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठतानाही महापालिकेची दमछाक झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. एमएमआरडीएकडून कर्जाचा पुरवठा करताना झालेला असहकार आणि हुडकोकडून मंजूर झालेल्या कर्जाचा अवाच्यासवा हप्ता पाहून महापालिकेचे डोळे पांढरे पडले आणि २२०० कोटींचा अर्थसंकल्प अपेक्षित उंची गाठूच शकला नाही. असे असतानाही भास्कररावांना आपला अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षीही कोटय़वधी रुपयांच्या अनुदान आणि कर्जाच्या डोलाऱ्यावर २५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असून तो यंदाही फसवा ठरण्याची शक्यता अधिक आहे.
ल्ल जुन्याच घोषणा
यंदाच्या अर्थसंकल्पाला नियोजनाचे जसे वावडे आहे, तसेच नव्या आणि शहराच्या विकासाला वेगळे आयाम मिळवून देऊ शकतील, अशा विकास प्रकल्पांचाही दुष्काळ दिसत आहे. मोरबे अ‍ॅम्युझमेंट पार्क, २४ तास पाणीपुरवठा, नेरुळ येथे पर्यटनस्थळ, सांडपाणी विक्री प्रकल्प, सोलार ऊर्जा प्रकल्प अशा जुन्याच प्रकल्पांची घोषणा यंदाही करण्यात आली असून मोरबे धरणावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची चावून चोथा झालेली घोषणा पुन्हा करण्यात आली आहे. एकात्मिक नाले विकास योजना राबविण्यासाठी एमएमआरडीएकडून ७५० कोटींपैकी २५० कोटी रुपये यावर्षी मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली असली तरी ही मदत पदरात पाडून घेण्याचे मोठे आव्हान यावर्षीही महापालिकेस पेलावे लागणार आहे.
ल्ल  गटर, वॉटर, मिटरची गुंतागुंत
मोठय़ा विकास प्रकल्पांच्या जुन्याच घोषणांची ‘री’ ओढत असताना यंदा अर्थसंकल्पात स्थापत्यविषयक कामांची अक्षरश जंत्री मांडण्यात आली आहे. पामबिच मार्गावर पूल बांधणे, ठाणे-बेलापूर मार्गावर तळवलीनाका जंक्शन येथे चार पदरी पुलांची उभारणी, रबाळे नाका येथे उड्डाणपूल, ऐरोली येथे अंडरपास तर मुकुंद कंपनी जंक्शन येथे दोन पदरी अंडरपास बांधण्याची नवी कामे यावेळी सुचविण्यात आली आहेत. पर्यावरण शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करण्याची जुनीच घोषणा यंदाही करण्यात आली असून इको सिटीच्या धर्तीवर शहरात नव्या प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ल्ल  आरोग्य सक्षमीकरण
यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य तसेच शिक्षणावर भर देताना नेरुळ आणि ऐरोली येथील १०० खाटांची दोन रुग्णालये कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेरुळ, कुकशेत, तळवली नाका येथे तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून घणसोली आणि दिघा येथे ५० खाटांचे नवे माताबाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ताणतणाव, वजनवाढ, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, व्यसनाधीनता अशा असांसर्गिक रोग टाळता यावेत तसेच त्यावरील उपचार पद्धती विकसित करण्यासाठी रुग्णालयीन स्तरावर ४० लहान क्लिनिक सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सार्वजनिक रुग्णालयांकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तसेच नर्सिग कॉलेज सुरू करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

कॅन्सर उपचारासाठी टाटा रुग्णालयासोबत करारनामा
नवी मुंबई महापालिकेने येत्या वर्षांत शहरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी भरीव अशी तरतूद करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाची घोषणा ठरणार आहे. कॅन्सरवरील वेगवेगळ्या चाचण्या, शस्त्रक्रिया, केमोथेरेपीसारखे उपचार महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांना उपलब्ध व्हावेत, यासाठी टाटा मेमोरियल संस्थेसोबत संयुक्त करारनामा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कॅन्सरवर तुलनेने स्वस्त उपचार उपलब्ध करून देता यावेत यासाठी महापालिका रुग्णालयांच्या स्तरावर काम करण्यात येणार आहे, अशी माहिती वानखेडे यांनी पत्रकारांना दिली. कॅन्सरवरील उपचारपद्धती अतिशय खर्चिक असून टाटा रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड असा भार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात नवी मुंबईतील रुग्णांसाठी कॅन्सर सेल तयार करता येईल का, याची चाचपणी टाटा रुग्णालयातील व्यवस्थापनाशी चर्चा करून केली जाणार आहे. तसेच टाटामधील काही तज्ज्ञांच्या मदतीने केमोथेरेपी, रेडिएशन सेंटर्सची उभारणी करून त्यासाठी लागणारी आर्थिक तजवीज महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न सुरूआहेत, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले.

’  नवी मुंबई महापालिकेने यंदा प्रथमच शहरात माहिती तंत्रज्ञानावर आधारित असे आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. तुर्भे सेक्टर १८ येथे महापालिकेने भलामोठे मलप्रक्रिया केंद्र उभारले असून त्यास लागूनच असलेला मोठा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहे. या भूखंडांवर प्रायोगिक तत्त्वावर आयटी पार्क उभारण्यात येणार असून या पार्क भाडेपट्टयावर द्यायचे किंवा एखाद्या मोठय़ा कंपनीला हस्तांतरित करायचे याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.

’ शहरातील वेगवेगळ्या भागात पाण्याची जलमापके बसविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असून येत्या मार्च २०१३ पर्यंत सर्व परिसरात २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ७५ टक्के परिसरात पाण्याचा २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे, असा दावाही महापालिकेने केला आहे.

Story img Loader