उत्तराखंडमधील प्रलयंकारी पुरात चारधाम यात्रेनिमित्त आलेले हजारो पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांबरोबरच तेथील पाळीव प्राण्यांचेही जीवन धोक्यात असल्याची जाणीव होऊन त्यांच्या मदतीसाठी ठाण्यातील प्राणीमित्र धावून गेले आहेत. जोशीमठ परिसरात अलकनंदा नदीवरील पूल वाहून गेल्याने या परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारे हजारो खेचर आणि त्यांचे मालक अडकून पडले असून सध्या त्यांना ट्रॉलीद्वारे अन्न तसेच औषध पुरवठा करण्यात या प्राणीमित्रांनी पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सध्या अलकनंदा नदीवर पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते काम पूर्ण होऊन पलीकडे अडकलेले सर्व खेचर सुखरूप आपापल्या घरी परतल्याशिवाय तिथून हटणार नाही, असा निर्धार प्राणीमित्र आदिती नायर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. ठाणेकर प्राणीमित्रांच्या या प्रयत्नांमुळे उत्तराखंडमधील पर्यटन व्यवसायाचा कणा असलेल्या हजारो खेचरांना आणि त्यांच्या मालकांना जीवदान मिळाले आहे.
गेल्या महिन्यात १७ जून रोजी उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे उडालेल्या हाहाकाराच्या बातम्या येऊ लागल्यानंतर ठाण्यातील ‘पाल’ (पेट ओनर्स अॅण्ड अॅनिमल लव्हर्स) संघटनेच्या सभासदांनी तेथील पाळीव प्राण्यांच्या शुश्रूषेसाठी जाण्याचा निर्णय घेतला. कारण तोपर्यंत केवळ माणसांचे जीव वाचविण्यालाच प्राधान्य दिले जात होते. निसर्गाच्या या रौद्र रूपात किती प्राणी मृत्युमुखी पडले याची कुणी मोजदादही केली नाही. पुनर्वसनाच्या अजेंडय़ावरही मुक्या प्राण्यांना फारसे स्थान नव्हते. तेव्हा तातडीने परिचितांकडून मिळालेल्या देणग्यांतून अकरा बॅगा औषधे खरेदी करून २४ जून रोजी आदिती नायर, डॉ. हेमंत थंडागे आणि इतर सहा सहकारी उत्तराखंडमध्ये पोचले. तेव्हा त्यांना अलकनंदा नदीच्या पलीकडे सुमारे दोन हजार खेचर आणि त्यांचे मालक अडकून पडल्याचे समजले. स्थानिक प्रशासन तसेच लष्कराच्या मदतीने त्यांनी तिथेच आरोग्य शिबीर भरवून जखमी प्राण्यांची शुश्रूषा सुरू केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा