सर्पदंश झाला.. नियमित तपासणी सुरू आहे मात्र रोगाचे निदान अचूक करण्यात अडचण येत आहे.. नियमानुसार लसीकरणाचे काम सुरू आहे, पण बाळाला ताप आहे काय करू.. माझ्या आजारावर सल्ला द्या, रक्ताची तातडीने गरज आहे.. अशा असंख्य वैद्यकीय अडचणींवर घरबसल्या उपचार होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या वतीने १०४ क्रमांकाची ‘ब्लड ऑन कॉल आणि हेल्थ अॅडव्हाइस सेंटर’ ही मदतवाहिनी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना या मदतवाहिनीने नवसंजीवनी लाभली असून आजवर हजारांहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी देशभरात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत एक मदतवाहिनी २०११ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. आरोग्यविषयक विविध सुविधा असल्या तरी रुग्णालयात जाण्या-येण्याची तसेच आरोग्याशी निगडित माहिती देण्यासाठी १०२, १०४ आणि १०८ या टोल फ्री क्रमांक असलेल्या मदतवाहिनीची निर्मिती करण्यात आली. १०२ ही सुविधा गर्भवतीस प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी तसेच घरी आणण्याकरिता तर १०८ ही सुविधा आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर, १०४ ही सेवा महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. या मदतवाहिनीद्वारे वैद्यकीय अडचणी, समस्या, प्रश्न, काही वेळा समुपदेशन याबाबत मार्गदर्शन केले जाते. याअंतर्गत सर्वसामान्यांना आनुवंशिक, संसर्गजन्य, साथीचे किंवा गुप्तरोग, एचआयव्ही, एड्स यांसह अन्य आजारांबाबत थेट डॉक्टरांचा सल्ला देण्यात येतो. काही ठिकाणी सर्पदंश झाला, रुग्णावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्याला काही अडचण आली, शालेय आरोग्य पथकाला काही अडचणी आल्यास त्यामार्फत सोडवणूक करता येऊ शकते. तसेच रुग्णालयाच्या ५० किलोमीटरच्या आवारातील कुठल्याही रक्तपेढीतून तातडीने दूरध्वनीवरून गरजू रुग्णाला रक्त मिळू शकते. त्याच वेळी सार्वजनिक तसेच खासगी वैद्यकीय सेवेच्या ठिकाणी आरोग्य सेवा नाकारली गेल्यास त्याबाबत थेट तक्रार नोंदविता येते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, आशा, परिचारिका, एम.पी.डब्ल्यू. यांसारख्या आरोग्य कर्मचारी मोठय़ा रुग्णालयांकडून मदत मागवू शकल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा चेहरा बदलण्यास मदत होत आहे. आजवर या मदत वाहिनीचा वैद्यकीय सल्ला, समुपदेशन तसेच तक्रार या तिन्ही गटांचा विचार केला तर हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. ग्रामीण तसेच विशेषत: आदिवासी भागातील लोकांसाठी जीवन अमृत ठरली असून नागरिकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे.
आरोग्य मदतवाहिनीचा हजारो रुग्णांना लाभ
सर्पदंश झाला.. नियमित तपासणी सुरू आहे मात्र रोगाचे निदान अचूक करण्यात अडचण येत आहे.. नियमानुसार लसीकरणाचे काम सुरू आहे, पण बाळाला ताप आहे काय करू..

First published on: 20-09-2014 at 01:24 IST
TOPICSरुग्ण
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of patients benefited from medical health line