दिंडी चालली पंढरी.. विठ्ठलाच्या दर्शनाला.. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी वारीत सहभागी झाले आहेत. काही पारंपरिक अशा १२ ते १३ संतांच्या पालख्या विदर्भातील विविध जिल्ह्यांतून यापूर्वी रवाना झाल्या आहेत. आषाढी एकादशीला विदर्भातून एक लाखावर वारकरी पंढरपूरला जातात. त्यातील काही पायीवारीसोबत, तर काही पुण्यापर्यंत बसने जाऊन पुढे पायीवारीत सहभागी होतात.
विदर्भातील हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी देहू आणि आळंदीवरून निवृत्तीनाथ, तुकोबारायांच्या पालखीत विठ्ठल नामाचा गजर करीत सहभागी झाले आहेत. नागपूर जिल्ह्य़ातून १० ते १२ पालख्या पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. वारीच्या संदर्भात बोलताना श्रीरामपंत जोशी यांनी सांगितले, गेल्या अनेक वषार्ंपासून वारीमध्ये विदर्भातून मोठय़ा प्रमाणात वारकरी एक महिना आधीच रवाना झाले असून तुकोबाराय, निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी झाले आहेत. शांतीनगरमध्ये मुक्ताताईचा मठ असून या ठिकाणाहून अक्षय तृतीयेला पालखी निघाली आहे. यात ७० ते ८० वारकरी आहेत. पंढरपूरला मुक्ताईचा मठ बांधण्यात आला असून त्याच ठिकाणी शहरातील वारकरी राहत असतात. गोविंद महाराज कन्हेरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी ही पालखी जात असे. मात्र, यावेळी त्यांचा नातू पालखी घेऊन गेला आहे. सध्या सीताराम तळेकर या पंढरपूरच्या मुक्ताई मठाचे काम पाहतात.
चांदूर रेल्वे तालुक्यातील भूईखेडमधून बेंडोली महाराजांची पालखी, चांदूरबाजारमधून संत गुलाबराव महाराजांची, वर्धेवरून सीताराम महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना झाली आहे. सीताराम महाराज सावनेरकर यांच्या नेतृत्वाखाली ही पालथी निघते. नरखेडवरून अमृत महाराज कोहळे-नरखेडकर महाराजांची पालखी निघाली. भीमराव कोथे या वारीचे नेतृत्व करीत आहेत. शेगाववरून गजाजन महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना झाली आहे. यात मोठय़ा प्रमाणात वारकरी सहभागी होतात. वासुदेवराव टापरे यांच्या नेतृत्वाखाली पालखी निघाली असून ते आळंदीवरून निघणाऱ्या पालखीत सहभागी झाले आहे.
आषाढी एकादशीच्या किमान दीड महिन्याआधी या सर्व पालख्या विदर्भातील विविध जिल्ह्य़ातून रवाना झाल्या आहेत.
विदर्भातून निघणाऱ्या पालखीला इतिहास आहे. मुक्ताईची पालखीला ७० वषार्ंचा इतिहास आहे आणि आजतागायत ती पंढरपूरला जाते. वारीमध्ये केवळ ज्येष्ठ आणि वयोवृद्ध लोकच जातात, असे नाही तर तरुण पिढी मोठय़ा प्रमाणात याकडे वळते आहे. चांदूरबाजारमधील निघालेल्या गुलाबराव महाराजांच्या पालखीत तिशीतील तरुण सहभागी झाले आहेत. शेगाववरून निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीत महिला, वयोवृद्धांसोबत युवती आणि युवक सहभागी झाले आहेत. वारीला जाण्यासाठी वयाचे आणि जातीचे बंधन नाही.
विदर्भातून गेलेल्या विविध पालख्या वेगवेगळ्या मठात वास्तव्य करतात. त्यासाठी विदर्भातील अनेकांचे मठ पंढरपूरला आहेत. जे लोक पायी वारी करू शकत नाही ते विदर्भाचे पंढरपूर धापेवाडाला जात असतात. या वारीत कुठे अभंग, कुठे कीर्तन, कुठे प्रवचन, तर कुठे नामस्मरण करीत वारकरी संतांचे माहेरघर पंढरपूपर्यंत पोहोचतात. जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर तो वारीमध्येच, असेही अनुभवाने अनेक वारकरी सांगतात.
विठ्ठलदर्शन एक्स्प्रेसच्या यंदाही चार फेऱ्या
प्रतिनिधी, बुलढाणा
आषाढी एकादशी निमित्ताने यंदाही खामगाव व अमरावती येथून पंढरपूरसाठी विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस धावणार आहे. विदर्भातील हजारो भाविकांचा प्रतिसाद पाहता यंदाही चार फेऱ्या सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. खामगाव व अमरावती येथून पंढरपूरकरिता गेल्या २००३ पासून विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस सोडण्यात येते. यंदा ९ जुलला आषाढी एकादशीनिमित्ताने चार फेऱ्या होणार आहेत. प्रथम फेरी ३ जुलैला दुपारी ४.२० वाजता खामगाव येथील रेल्वे स्थानकावरू न, तर दुसरी फेरी ४ जुलैला दुपारी ४.२० वाजता, तिसरी फेरी ६ जुलैला दुपारी ४.२० वाजता, तर चौथी शेवटची फेरी ७ जुलैला दुपारी ४.२० वाजता खामगाव येथून रवाना होऊन पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसला खामगाव येथून ६ जनरल बोगी, १ आरक्षित व १ एसएलआरची बोगी राहणार आहे, तर अमरावती येथूनही याच तारखांना ३ जनरल, ३ आरक्षित, १ एसी कोच, १ एसएलआर, अशा ८ बोग्या असलेली विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे. अमरावती येथून या एक्स्प्रेसची निघण्याची वेळ दुपारी २ वाजताची राहणार आहे. अमरावती येथून जलंब येथे आल्यानंतर दोन्ही ठिकाणाच्या बोग्या जोडण्यात आल्यानंतर जलंब येथून १६ बोग्यांची विठ्ठलदर्शन एक्स्प्रेस ५.२० वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. नांदुरा येथे ५.५५, मलकापूर येथे ६.४० वाजता, तर पंढरपूर येथून परत येण्यासाठी या एक्स्प्रेसची पहिली फेरी ४ जुलै, दुसरी ५ जुलै, तिसरी १० जुलै, चौथी व शेवटची फेरी ११ जुलैला सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस पंढरपूर येथून दुपारी ४ वाजता निघणार असून खामगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता, तर अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १०.४० वाजता पोहोचणार आहे. ज्येष्ठ नागरिक सवलत घेणाऱ्यांनी वयाबाबत पुरावा असलेला कागद सुविधेसाठी सोबत बाळगावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा