भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून विदर्भातील अकराही जिल्ह्य़ातील हजारो बेरोजगार युवकांचे जथ्थे शहरात दाखल झाले आहेत. बस व रेल्वे स्थानक, क्लब ग्राऊंड, जिल्हा स्टेडियम, तसेच न्यू इंग्लिश क्रीडांगणांवर युवकांची गर्दी बघायला मिळत असून विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या राहण्याची, चहा-नाश्ता व जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे.
नागपुरातील सैन्य भरती कार्यालयाने विदर्भातील अकराही जिल्ह्य़ांसाठी येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात सोल्जर, जनरल डय़ुटी क्लार्क, सोल्जर टेक्निकल, नर्सिग असिस्टंट, ट्रेसमन अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. या सैन्य भरती कार्यक्रमात विदर्भातून ३० ते ४० हजार बेरोजगार युवक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. १ डिसेंबर रोजी अकोला, भंडारा, नागपूर व वाशिम जिल्ह्य़ातील युवकांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत युवकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी व त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी होणार आहे. २ डिसेंबर रोजी अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा व यवतमाळ जिल्हय़ातील युवकांसाठी होईल, तर ३ डिसेंबरला चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्य़ातील युवकांसाठी व ४ रोजी पुन्हा अमरावती, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्य़ातील युवकांसाठी भरती होणार आहे. सैनिकांची मुले व खेळाडूंसाठी ५ डिसेंबरला भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. युवकांनी दहावी, बारावीची गुणपत्रिका, मूळ प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, सरपंच व पोलीस पाटलांचा दाखला, पदविका, प्रमाणपत्र, एलसीसी, एबीसी प्रमाणपत्र, १६ रंगीत छायाचित्रे सोबत आणावयाची आहे. सैनिक पदासाठी वयोमर्यादा साडेसतरा ते २१ वष्रे, तर इतर पदांसाठी २३ वर्षे असून उंची १६८, तर वजन ५० किलो असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीसाठी उंची १६२, तर वजन ४८ किलो आहे.
भरती प्रक्रियेला पहाटेपासूनच सुरुवात होत असल्याने बेरोजगार युवकांचे जथ्थेच्या जथ्थे आज दुपारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. नागपूर, वाशिम, अकोला व भंडारा या जिल्ह्य़ातील युवक मिळेल त्या बस, रेल्वे व खासगी प्रवासी गाडय़ांनी येथे आले आहेत. या सर्वाची राहण्याची, जेवणाची, तसेच चहा-नाश्त्याची व्यवस्था शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. ज्येष्ठ व्हॉलीबाल संघटनेने जेवणाची जबाबदारी स्वीकारली असून माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश क्रीडांगण युवकांना उपलब्ध करून दिले आहे. तेथे भव्य शामियानात सर्वाची झोपण्याची व्यवस्था आहे. काही युवकांनी शहरातील हॉटेल्स, लॉजमध्ये मुक्काम ठोकला आहे, तर बहुतांश युवक समाज भवन, सिंधी पंचायत, विश्रामगृह येथे आश्रयाला आहेत. जिल्हा क्रीडांगणावरही युवकांच्या राहण्याची व्यवस्था आहे, तर काही सामाजिक संघटनांनी शहरातील मंगल कार्यालय युवकांना उपलब्ध करून दिले आहे. नागपूर एनजीओतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या क्रीडांगणावर मंडप उभारून राहण्याची व्यवस्था केली आहे. घरकुल संस्थेचे राम इंगोले यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. सैन्य भरतीदरम्यान दलाल सक्रीय राहत असल्याने युवकांनी त्यांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन कर्नल एम.एस.बेन यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा