क्षुल्लक वादातून एका महिलेस बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांच्या विरोधात मारहाणीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
मानखुर्द येथील बीएआरसी कॉलनी समोरील माऊंट व्ह्यू सोसायटीत राहणाऱ्या मनिषा प्रधान (४७) या महिलेने त्याच सोसायटीत राहणाऱ्या बाल कुटुंबियांना बेशिस्तीच्या कारणावरून हटकले होते. त्याचा राग धरून बुधवारी संध्याकाळी इंद्रजित बाल, परमजित बाल आणि पवन बाल यांनी प्रधान यांच्याशी भांडण केले होते. त्यावेळी इंद्रजित बाल (३८) याने मनिषा प्रधान यांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत प्रधान यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सुरवातीला अदखपात्र गुन्हा दाखल केला होता नंतर गुरुवारी मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप या तिघांना अटक झालेली नाही.

Story img Loader