सोलापुरतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक भीमराव पाटील-वडगबाळकर यांना त्यांच्या व्यवसायात भागीदार म्हणून घ्या नाही तर पन्नास लाखांची खंडणी द्या, अशी मागणी करून धमकावल्याप्रकरणी अप्पासाहेब मल्लिनाथ पाटील व इतर पाचजणांविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अप्पासाहेब पाटील हा पूर्वाश्रमीचा गुंड असलेल्या व कर्नाटकातील एका माजी आमदाराचा भाचा असल्याचे सांगण्यात आले.
अप्पासाहेब पाटील (रा. सात रस्ता, सोलापूर) हा आपल्या पाच साथीदारांसह टोयोटो फोर्च्यून मोटारीतून भीमराव पाटील यांच्या सदर बझार भागातील कार्यालयात आला. त्या वेळी कार्यालयात भीमराव पाटील हे कामकाज पाहात बसले होते. अप्पासाहेब पाटील व त्याच्या साथीदारांनी भीमराव पाटील व त्यांचे पुत्र सतीश पाटील यांना धमकावत पन्नास लाखांची खंडणी मागतिली. खंडणी देता येत नसेल तर तुमच्या कंपनीत भागीदार म्हणून घ्या, असे अप्पासाहेब पाटील हा धमकावत होता. तातडीने खंडणी न दिल्यास तुमचे बाहेर फिरणे मुश्कील करू, अशी धमकी त्याने दिल्याचे भीमराव पाटील यांच्या कार्यालयातील सिद्धराम श्यामराव पाटील या कर्मचाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. भीमराव पाटील हे बडे बांधकाम व्यावसायिक असून हे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटचे समजले जातात. हा खंडणी मागण्याचा व धमकावण्याचा प्रकार सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी शेजारीच असलेल्या पाटील यांच्या कार्यालयात घडला.

Story img Loader