पावणे तीन लाखाची लूट
‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे सांगून समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी देत पिंपळनेर येथील दोघांनी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून पावणे तीन लाखाहून अधिकची रक्कम काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. नाशिक येथील कॅनरा बँकेच्या शाखेतील ही रक्कम ‘एटीएम’द्वारे धुळे जिल्ह्यात काढण्यात आली. या संदर्भात संबंधित व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर दोघा संशयितांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास हेमंत जाधव व विवेक हेमंत जाधव अशी या संशयितांची नांवे आहेत. विलास जाधव हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून शहापूर तालुक्यातील खर्डी येथे कार्यरत होता. २० वर्षांपूर्वी या प्रयोगशाळेत पुण्यातील एका व्यक्तीची ‘एचआयव्ही’ चाचणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित व्यक्तीला एड्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याचा गैरफायदा घेत विलास व विवेक यांनी संबंधित व्यक्तीला धमकाविणे सुरू केले. एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती तुझ्या नातेवाईकांना कळवू असे धमकावून या जोडगोळीने संबंधित व्यक्तीच्या नाशिक  येथील कॅनरा बँकेच्या खात्यातून तब्बल दोन लाख ८० हजार रूपये काढून घेतले. यासाठी त्यांनी स्टेट बँकेच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील ‘एटीएम’ यंत्राचा वापर केला.
विवेक जाधवने या संपूर्ण प्रकरणात विलासला मदत केली. हे उघडकीस येताच संबंधित व्यक्तीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

Story img Loader