संगमनेर रस्त्यावर राजुरीनजीक गावठी पिस्तुल व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून शहरातील पत्रकार विकास अंत्रे यांना काल रात्री पावणे अकरा वाजता लुटण्यात आले. लुटमारीच्या या घटनामुळे आता रात्री १० नंतर या रस्त्यावरील वाहतूक थंडावली असून लुटमारीच्या घटनांचे सत्र रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
अंत्रे व निशिगंधा गाडेकर (वय ५४) हे  संगमनेर रस्त्याने काल रात्री १०.३० वाजता बाभळेश्वर मार्गे सोनगावकडे दुचाकीवर निघाले होते. त्यांचा दोन दुचाकीवरून पाच तरुण पाठलाग करत होते. त्यांची तोंडे बांधलेली होती. राजुरीनजीक त्यांनी अंत्रे यांना आडविले. त्यांना प्रथम चाकूचा धाक दाखविला नंतर पिस्तुल व रिव्हॉल्वरने त्यांना लुटारुंनी धमकावले. पाचही तरुणांकडे आधुनिक शस्त्रे होती. अंत्रे यांच्याकडील मोबाईल, घडय़ाळ, रोख रक्कम व गाडेकर यांच्याकडील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व मोबाईल लुटारुंनी काढून घेतला. त्यानंतर अंत्रे यांची दुचाकीही लुटारुंनी चोरुन चालविली होती. पण समोरुन मोटारगाडी आल्याने त्यांनी दुचाकी न नेता पोबारा केला.
घटनेची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिता साळुंके-ठाकरे यांना देण्यात आली. त्यांनी शहर व लोणी पोलीसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पण लोणी पोलिसांनी कुठलीही हालचाल केली नाही. लोणी पोलीस ठाण्यात अंत्रे यांनी फिर्याद नोंदविली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Story img Loader