भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पहिले आवर्तन सोमवारी (दि. १०) सोडण्यात येणार आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शंकरराव गडाख, भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ उपस्थित होते.
भंडारदरातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. ऑगस्ट २०१३ पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी किती आवर्तने करणार? तसेच उर्वरित दोन आवर्तनांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्याचे काम सध्या सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पाण्यासंदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने लोकप्रतिनिधी, अधिकारी, सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी बसून निर्णय घ्यावा व उच्च न्यायालयात अहवाल सादर करावा, असा आदेश दिला होता. त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शेतीच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले.  जायकवाडीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांत असंतोष असून सर्वपक्षीय आंदोलने झाली. या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले होते. थोरात, विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी नियोजन करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले, असे ससाणे व कांबळे यांनी सांगितले.

Story img Loader