शहराच्या गुलमोहोर रस्त्यावरील स्वामी समर्थ दूध प्रॉडक्ट प्रा. लि. ही कंपनी बनावट ठराव करून व खोटी कागदपत्रे तयार करून बळकावण्याचा प्रयत्न केला तसेच सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच त्यातील तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये कंपनीच्या दोघा संचालकांचा व चार्टर्ड अकौंटंटचा समावेश आहे.
अशोक बाजीराव ढगे, त्याचा भाऊ दत्तात्रेय ढगे (दोघेही रा. निमगाव गांगर्डा, कर्जत) या दोन संचालकांसह चार्टर्ड अकौंटंट प्रमोद नयनसुखलाल नहार (माळीवाडा, नगर) या तिघांना अटक करण्यात आली, तिघांनाही दि. ३१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. शकुंतला विश्वनाथ पादीर (खातगाव टाकळी, नगर), हृषीकेश राजहंस (पुणे), संभाजी अशोक ढगे (निमगाव गांगर्डा) व सुमन बाजीराव ढगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कंपनीच्या अध्यक्ष जयश्री संजय गिरवले यांनी फिर्याद दिली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यालय गुलमोहोर रस्त्यावर आहे तर दूधसंकलन व शीतकरण केंद्र कर्जत तालुक्यात आहेत. १३ जून ते २२ डिसेंबर दरम्यान सात जणांनी खोटे ठराव व कागदपत्रे तयार करून कंपनीचे चार नवीन संचालक केले तसेच कर्जतमधील मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा