गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी इचलकरंजीत घडलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी शुक्रवारी केली. यामध्ये एका पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी इचलकरंजी गावभाग पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
त्यांच्यावर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न, कट रचने, मारामारी या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय एकूण १५ मुख्य लोकांसह १२५ जणांवर गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.     
इचलकरंजी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना जमावाकडून मारहाण झाली होती. तसेच गावभाग पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी राकेश वसंत कोतमीरे, (वय २६ रा.महासत्ता चौक), संजय आनंदराव जगताप (वय ३०, रा.अनुबाई शाळेजवळ), सुहास वसंतराव माळी (वय ३७ रा.चांदणी चौक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा पंधरा मुख्य आरोपींसह १२५ जणांवर दाखल केला जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सायंकाळी पत्रकारांना सांगितले. याशिवाय गावभाग पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याप्रकरणी आणखी काही जणांवर स्वतंत्ररीत्या गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.     
दरम्यान इचलकरंजीतील दंगलसदृश्य परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक जाधव यांनी स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे. त्याची जबाबदारी मुख्यालयातील पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला पाच पोलीस उपनिरीक्षक देण्यात आले आहेत.

Story img Loader