राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहफुलांची ५०० पोती वाहून नेणारा ट्रक पकडला असून एकूण १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र, या धंद्यातील मुख्य सूत्रधार फरार आहे.
प्रत्येकी ४५ किलो मोहफुले एका पोत्यात भरण्यात आली होती. एकूण ५०० पोते मिळून २२ हजार ५०० किलो मोहफुलांचा साठा व संबंधित कागदपत्रे असा १४ लाख ७५ हजार किमतीचा मुद्देमाल ट्रकचा वाहक आणि इतर दोघांकडून जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहंमद आबीद वल्द मोहंमद गफूर(वय २५ वर्षे), मोहंमद शकील वल्द मोहंमद रफीक(वय २३ वर्षे) आणि दीपक सुखराम धुर्वे(वय २० वर्षे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, धंद्याचा मुख्य सुत्रधार गिरीधर सुरजमल खंडेलवाल फरार आहे. हे सर्वजण मध्य प्रदेशाच्या सिवनीचे राहणारे आहेत.
परराज्यातील अवैध दारू, स्पिरीट व मोहफुले यांच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याकरता परराज्यांच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात सुट्टीच्या दिवशी अवैध वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे. त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बुटिबोरी-वर्धा मार्गावरील सावंगी(आसोला) येथे एम.पी.-२२/एच-०६२१ क्रमांकाच्या ट्रकवर लक्ष ठेवून होते. ट्रकमध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरून तो मोहफुलांनी भरलेला ट्रक सिल्व्हासा येथे जाणार होता. मात्र वाहन चालक व ट्रकमधील अन्य जणांना सिल्व्हासा कोठे आहे हेही माहीत नव्हते. पुढील चौकशीत या बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहफुलांच्या साठय़ाची यवतमाळ जिल्ह्य़ात वाहतूक सुरू होती. राज्य उत्पादन विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागीय भरारी पथकाने निरीक्षक प्रशांत गोतमारे, दुय्यम निरीक्षक नारायण धुरड, राहुल अंभोरे तसेच जवान मिलिंद काळे, प्रकाश मानकर व मिलिंद गायकवाड यांनी ही कारवाई केली. धुरड पुढील तपास करीत आहेत.
या पथकाने यापूर्वीही रसायनाच्या नावाखाली अवप्तध स्पिरिटची महाराष्ट्रात वाहतूक करण्याबाबतचा गुन्हा शोधून १२ हजार लीटर स्पिरीटसह टॅंकर पकडून एकूण ६०लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.
परराज्यातील अवैध मद्य, स्पिरीट व मोहफुलांची वाहतूक करणाऱ्यांच्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम उघडली आहे.    

Story img Loader