खर्डी येथील सरकारमान्य रेशन दुकानातील सुमारे २६ क्विंटल गहू कळमगांव येथील साईबाबा फ्लोअर मिलमध्ये काळ्या बाजारात विकत असताना शहापूर पोलिसांनी अचानक धाड टाकून तिघांना अटक केली. या धाडीत १३ हजार २५० रुपये किमतीचा ५३ पोती गहू आणि मालवाहू जीप जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी गव्हाचा काळा बाजार करणारे खर्डी येथील रेशन दुकानदार सुनील गोपाळे, भगवान भोईर व साईबाबा फ्लोअर मिलचे व्यवस्थापक नागसेन आचरेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मिलचे मालक रियाज निजामुद्दीन सिद्दिकी (रा.कळवा), व हरेशकुमार वालेचा (रा.उल्हासनगर) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सुनील गोपाळे यांच्या सरकारमान्य रेशन दुकानातील १५ पोत्यांवर मध्यप्रदेश सिव्हील कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, २४ पोत्यांवर गव्हर्मेट ऑफ पंजाब असा शिक्का होता. तसेच इतर मिळून प्रत्येकी ५० किलोची ५३ पोती पोलिसांनी जप्त केली. त्याचप्रमाणे माल वाहतूक करणारी जीपही जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेला गहू गोदामात ठेवण्यात आला आहे.
या गव्हाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येऊन त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार सुनील भुताळे यांनी दिली.    

Story img Loader