चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यानंतर धावत्या रेल्वेतून उडी टाकल्याने दोन तरुणींसह तिघांचा बुधवारी सकाळी मिरज रेल्वे स्टेशन नजीक कुर्डुवाडी पॅसेंजरखाली सापडून मृत्यू झाला. एक तरुण या अपघातात गंभीर जखमी असून त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यू पावलेल्या एका तरुणीचे गुरुवारी गोकाक येथे लग्न होते.
बुधवारी सकाळी मिरजहून कुर्डुवाडीला जाणारी पॅसेंजर नेहमीप्रमाणे सुटली. बेळगाव आणि कुर्डुवाडीकडे जाणारे रेल्वेचे मार्ग एकाच दिशेला असले तरी वेगवेगळे आहेत. रेल्वे स्थानकापासून एक कि.मी. अंतरानंतर दोन्ही मार्ग वेगवेगळे होतात. सकाळी सव्वासहा वाजता कुर्डुवाडी पॅसेंजरमधून चौघा प्रवाशांनी उडय़ा टाकून चुकीची गाडी बदलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरेश िलगाप्पा गुडदिरी (वय २६) वैष्णवी श्रावण गुडदिरी (वय १५) आणि भागीरथी शिवराम गस्ते (वय २८) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर फकिराप्पा गुडदिरी (वय २४) हा गंभीर जखमी झाला.
अपघातग्रस्त बेळगाव जिल्ह्यातील पाच्छापूर (ता. हुक्केरी) येथील असून मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली. मयत झालेली भागीरथी गस्ते हिचा गुरुवारी (उद्या) गोकाक येथे विवाह निश्चित झाला होता. राहत्या घरासमोर असणाऱ्या शेजाऱ्याच्या घरात हे सर्व जण मेंदी काढण्यात मग्न होते. भागीरथी हिच्या दोन्ही हातांवर मेंदी रेखाटण्यात आली आहे. अपघातग्रस्त एकमेकांचे नातलग असून त्यांचे कुटुंबीय मंगळवारी रात्रीपासून त्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. जखमी फकिराप्पा अद्याप बोलण्याच्या स्थितीत नसल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी घटनेनंतर तत्काळ संपर्क साधला. मात्र सर्व जण आम्ही लग्नाच्या गडबडीत असल्याने नेमकी घटना का व कशासाठी घडली हे सर्व जण मिरजेत कशासाठी आले याची नेमकी माहिती समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. यातील दोन्ही तरुणी नाइट गाऊनमध्ये असल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण संशयास्पद आहे. पोलिसांनी हा अपघात चालत्या रेल्वेतून उडय़ा मारल्याने घडल्याचे सांगितले असले, तरी हे सर्व जण मिरजेस येण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.
अपघात घडल्यानंतर सांगलीच्या हेल्पलाइन समूहाने तत्काळ हालचाली करून एका गंभीर जखमीला रुग्णालयात हलविले. अपघातस्थळी दोन मोबाइल व दोन सीमकार्ड मिळून आले असून पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मयताची नोंद करण्यात आल्याचे निरीक्षक िभगारदिवे यांनी सांगितले.