मुंबई आणि परिसरातील तीन पिठाच्या गिरणीचालकांच्या हत्येप्रकरणात सिरीयल किलरच असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकसत्ता’ने या हत्यांमागे सिरीयल किलर आहे, असे वृत्त (१ डिसेंबर २०१२) रोजी दिले होते ते खरे ठरले आहे. परंतु या तिन्ही हत्या करणारा सिरीयल किलर कल्पनाथ उर्फ कल्लू जैसवार याने पोलिसांनी पकडण्यापूर्वीच रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. २८ सप्टेंबरला दहिसरच्या श्रीकृष्ण फ्लोअर मिलचे मालक फुलचंद यादव यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली होती. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी यादव यांचा मित्र आणि भाजीविक्रेत्या तरुणाला अटक केली होती. ज्या पद्धतीने यादव यांची हत्या झाली त्याच पद्धतीने सव्वा महिन्याच्या काळात मुंब्रा आणि कल्याण येथेही दोन पिठाच्या गिरणी मालकांच्या हत्या झाल्या होत्या. त्यांचीही हत्या डोक्यात हातोडा घालून आणि पिठाची गिरणी बंद असते त्यावेळी रात्री झाली होती. या तिन्ही हत्या एकाच व्यक्तीने केल्या असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. परंतु पोलिसांनी या तिन्ही प्रकरणात वेगवेगळे आरोपी पकडून क्षुल्लक कारणांवरून या हत्या झाल्याचे सांगत सिरियल किलरची शक्यता फेटाळून लावली होती.
मात्र, याच दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या युनिट १२ च्या पथकाला या हत्यांमागे सिरीयल किलर असण्याची खात्री वाटली आणि त्यांनी तपास केला. तपासादरम्यान कल्पनाथ उर्फ कल्लू जैसवार (५०) याचा संशय त्यांना आला. जैसवार हा उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील लालगंज गावात राहणारा होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले की, या तिन्ही हत्यांमध्ये समान धागा असल्याचा संशय आल्यानंतर आम्ही तपास केला आणि कल्लू जैसवारचे नाव समोर आले. पण तो सतत आम्हाला चकमा देत होता. तो मोबाईल वापरत नव्हता आणि सतत आपला मुक्काम बदलत होता. आमचे पथक त्याला पकडण्यासाठी कल्याण आणि त्याच्या मूळ गावी तळ टोकून होते. १६ डिसेंबरला तो आझमगड येथे आला. पण पोलीस गावात आहेत आणि आता आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. कल्लू जैसवार ट्रकचालक होता. गेल्या १५ वर्षांत त्याने तब्बल ८ हत्या केल्याचे आणि त्यापैकी ५ हत्या ट्रकचालकांच्या होत्या, असे खेतले यांनी सांगितले.
जैसवार ट्रकचालकांची हत्या करून त्यांचा टँकर अथवा ट्रक पळवून न्यायचा. पण एकदाही पोलिसांच्या हाती लागला नव्हता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिली. हरयाणा आणि दिल्लीचे पोलीसही त्याच्या मागावर होते. हत्या करून त्यांच्याकडील पैसे घेऊन तो फरारी होत असे. सगळीकडून कोंडी झाल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सावंत यांनी सांगितले.
या तिन्ही हत्यांमागील खरा गुन्हेगार कोण ते कळल्याने दहिसर, मुंब्रा आणि कल्याण पोलिसांनी अटक केलेल्या तीन निरपराध लोकांची सुटका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव तसेच संतोष संख्ये, सचिन सावंत, शिवाजी चाकणे, गडदे आणि मोहन बाबू यांनी केला.
या होत्या तीन हत्या
* २८ सप्टेंबर- राजकुमार जैसवार , कल्याण
* २४ नोव्हेंबर- फुलचंद यादव- दहिसर, श्रीकृष्ण फ्लोअर मिल
* ४ ऑक्टोबर- रामलखन जैसवार , मुंब्रा, प्रथिक फ्लोअर मिल

तिन्ही हत्यांमागचे समान दुवे
* तिन्ही हत्या डोक्यात हातोडा घालून
* हे हातोडे गिरणीच्या दगडाला टाके घालण्याठी वापरले जातात
* हत्येनंतर मृतदेहांवर पीठ टाकण्यात आले होते.
* तिघांच्याही डोक्यात वर्मी घाव होता

Story img Loader