शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेला बिबटय़ा पकडता तर आलाच नाही, पण त्याच्या हल्लयात वनखात्याचे तीन कर्मचारी जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या दोघांवर नगरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कारेगाव शिवारात घडली.
कारेगाव शिवारात अशोक ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या जमिनीत असलेल्या चारीत काल शिकार करणारांनी मोर व ससे पकडण्यासाठी सापळे लावले होते. रात्री सापळ्याच्या खटक्यात बिबटय़ाचा पाय अडकला. सकाळी शिकारी सावज पाहण्यासाठी गेले असता बिबटय़ा पाहून त्यांना घाम फुटला. त्यांनी अन्य शेतकऱ्यांना ही माहिती दिली. तोपर्यंत खोकर, कारेगाव, भोकर व टाकळीभान या पंचक्रोशित वाऱ्यासारखी पसरली. चार ते पाच हजार लोक बिबटय़ाला पाहण्यासाठी जमा झाले. वनखाते व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन गर्दी हटविली.
वनखात्याच्या नगरहून आलेल्या कर्मचाऱ्यांकडे बिबटय़ा बेशुद्ध करण्याचे औषध होते. पण, औषध टोचण्यासाठी लागणारी गन नव्हती. ती कोपरगाव येथून मागवण्यात आली. दुपारी साडेबारानंतर बिबटय़ाला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याने तत्पुर्वीच खटक्यातून सुटका करून घेत वन खात्याच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढविला. त्यात वनरक्षक बाजीराव अडसुरे, रामचंद्र विष्णू झिंजुर्डे व वनपाल सुभाष जाधव हे तिघे जखमी झाले. झिंजुर्डे व जाधव यांना शिर्डी येथील साई बाबा रूग्णालयात व नंतर नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. आता वनखात्याने बिबटय़ाला पकडण्यासाठी तेथे पिंजरा लावला आहे.
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी, अशोकनगर व पढेगाव येथे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या आहेत. मोर, हरिण, ससे व रानडुक्कर यांची त्या नेहमी शिकार करतात. यापुवीर्ही या शिकारी टोळीच्या सापळ्यात बिबटय़ा अडकला होता. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. आता पुन्हा बिबटय़ा अडकल्याने शिकारीचे प्रकरण पुढे आले आहे. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.