अमोल मेजारी, दीपक गवारे आणि वैभव पानवलकर या तिघांमध्ये काही साम्ये आहेत. तिघेही आता ‘आयआयटीयन’ आहेत. तिघेही महाराष्ट्रीय-मराठी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिघांचीही पाश्र्वभूमी अशी की घरात कुणाला आयआयटीचे स्वप्नसुद्धा पडण्याची शक्यता नाही. आयआयटीमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, अशी इच्छा आणि त्यानुसार प्रयत्न या बाबी तर फारच दूरच्या! मात्र या तिघांची दुर्दम्य इच्छाशक्ती व अभ्यासू वृत्ती आणि त्यांना ‘महानगर गॅस’ आणि ‘सेंटर फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड लीडरशिप’ (सीएसआरएल) या संस्थांच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात आलेल्या ‘अभयानंद सुपर ३०’ या उपक्रमाची मिळालेली तेवढीच तोलामोलाची साथ यातून हा ‘समसमे संयोग की जाहला’ योग जुळून आला.
शेतकरी कुटुंबातील अमोल मेजारी सरकारच्या घरकुल योजनेतील एका छोटय़ाशा घरात वाढला. शेतीवर अवलंबून असलेले पाच माणसांचे कुटुंब. मात्र बेताच्या परिस्थितीतही अमोलचे अभ्यासातील सातत्य वाखाणण्याजोगे होते. त्या जोरावर त्याने आयआयटी दिल्लीत मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. दीपक गवारेचे वडील हिंगोलीत रिक्षा चालवतात. तर वैभव गुहागर येथील सुतार कुटुंबातील सदस्य.
१९७७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अभयानंद यांच्या नावाने ‘अभयानंद सुपर-३०’ हा उपक्रम बिहारमध्ये सुरू करण्यात आला होता. गरीब आणि होतकरू तरुणांची निवड करून त्यांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करण्याचा हा उपक्रम आहे. महानगर गॅस आणि सीएसआरएलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तो राबवण्यात आला. या माध्यमातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाइंदर, कल्याण आणि अंबरनाथबरोबरच कोकणातीलही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. वर्षभर या विद्यार्थ्यांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची इत्थंभूत माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. त्यातूनच या तिघांची निवड वेगवेगळ्या आयआयटींमध्ये झाली आहे.
राजापूरमध्ये राहणाऱ्या अमोलचे वडील शेतकरी असून तीन भावंडांचे कुटुंब वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. पाचवीमध्ये असताना अमोलची निवड नवोदय विद्यालयात झाली होती. तेथेच त्याने अभयानंद सुपर उपक्रमाची प्रवेश परीक्षा दिली होती. आज त्याची ती मेहनत फळाला आली. दीपकचे वडील रिक्षाचालक असून हिंगोलीतून तो या उपक्रमात सहभागी झाला होता. त्याला आयआयटी गुवाहाटीमध्ये प्रवेश मिळाला आहे. वैभवचेही अभियांत्रिकीचे स्वप्न या उपक्रमामुळे साकार होणार आहे.
अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलांना चांगली गुणवत्ता असूनदेखील मोठी स्वप्ने पाहता येत नाहीत. मात्र आमच्या उपक्रमातून अशा मुलांना शैक्षणिकदृष्टय़ा मदत केली जाते. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो आहे.
व्ही. सी. चित्तोडा,
व्यवस्थापकीय संचालक , महानगर गॅस