पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येतात. मात्र त्यास अधिकारी-कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील एका घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. पाकीट आणि मोबाइल चोरीची तक्रार करण्यासाठी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गेलेल्या दोघा भावांची तक्रार घेण्याऐवजी त्यांना फुकटचे सल्ले देण्यात पोलिसांनी धन्यता मानली.
तासन्तास तिष्ठत ठेवूनही पोलीस तक्रार घेण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सिंघल यांनी फैलावर घेताच अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली आणि त्यांनी अखेर त्या भावांची तक्रार नोंदवून घेतली.
ठाणे पूर्वेत राहणारे मनीष कुमार (२४) अंधेरीतील एका खासगी बँकेत कार्यरत असून सोमवारी सायंकाळी घाटकोपरहून लोकलने ठाण्यात आले. ठाणे स्थानकातील पुलावर कुमार यांचा भाऊ मनीष मोहन हा त्यांची वाट पाहत उभा होता. त्या वेळी कुमार यांच्या खिशातील पाकीट आणि स्मार्ट फोन चोरीला गेला.
पाकिटात नऊशे रुपये, डेबिट कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र आणि वाहन परवाना अशी महत्त्वाची कागदपत्रे त्यात होती. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी दोघांनी कोपरी पोलीस ठाणे गाठले. मात्र हद्दीच्या वादामुळे त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात पाठविण्यात आले.
तेथे कुमार आणि मोहन यांना पोलिसांच्या आडमुठेपणाचा सामना करावा लागला. कुमार यांना दिल्लीला जायचे होते आणि ती एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून सुटणार होती. तसेच ती सुटण्याची वेळही झाली होती. त्यामुळे तिला पकडण्यासाठी ते निघून गेले, तर त्यांचा भाऊ मोहन तक्रार दाखल करण्यासाठी ठाणे पोलीस ठाण्यात बसून राहिला. आधी तक्रार नोंदविण्यासाठी थांबा, असे सांगणारे पोलीस अचानक तक्रार घेण्यास नकार देऊ लागले.
विशेष म्हणजे, एका ठाणे अंमलदाराने तर तक्रार घेण्यास मूड नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या मोहन यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराविषयी माहिती दिली.
त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत सिंघल यांनी ठाणे रेल्वे पोलिसांना फैलावर घेतले आणि तातडीने तक्रार दाखल करून घेण्याचा आदेश दिला.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली. दरम्यान, पोलिसांच्या या बेजबाबदारपणामुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचे मनीष मोहन यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
तक्रार दाखल करून घेण्यासाठी तीन तास..
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येतात. मात्र त्यास अधिकारी-कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील एका घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
First published on: 31-10-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three hours to file a complaint