शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नवीन वर्षांत तीन विभागाचे २० खाटांचे अतिदक्षता वॉर्ड (आयसीयू) निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये शस्त्रक्रिया, मेडिसीन (औषधशास्त्र) आणि नवजात शिशु विभागाचा समावेश आहे.
हे तीन विभागाचे अतिदक्षता वॉर्ड जुन्या रक्तपेढीच्या इमारतीजवळील खुल्या जागेत होणार आहे. हे वॉर्ड एल आकाराचे राहणार असून प्रत्येक वॉर्डासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या तिन्ही अतिदक्षता वॉर्डासाठी शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून मेडिकलच्या विकासासाठी १५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तर काही मदत राज्य शासनाकडून मिळणार आहे. तसेच या तीन वॉर्डासाठी केंद्र सरकारकडून आणखी ४० कोटींची यंत्रसामुग्री मिळणार आहे.
ज्या ठिकाणी हे तीन वॉर्ड तयार करण्यात येणार आहे, तेथे ६० झाडे असून ती तोडण्याची परवानगी महापालिकेला मागण्यात आली आहे. यापूर्वी ट्रॉमा केअर सेंटरसाठी २०० झाडे तोडण्यात आली. परंतु त्याऐवजी दुसरी झाडे लावण्यात आली नाही. त्यामुळे ही झाडे कापण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. झाडे कापण्याची परवानगी मिळताच, वॉर्डच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. सध्या मेडिकलमध्ये एकच अतिदक्षता विभाग आहे. या विभागात सर्वच प्रकारचे गंभीर रुग्ण दाखल केले जातात. त्यामुळे उपचारासाठी काही मर्यादा येतात. त्यामुळे तीन नवीन अतिदक्षता वॉर्ड तयार करण्याची परवानगी राज्य शासनाला मागण्यात आली होती.
अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू
जेथे हे तीन वॉर्ड उभे राहणार आहे, तेथे विविध जातीची ६० झाडे आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेला मागितली आहे. महापालिकेने ही परवानगी नाकारली आहे. ही परवानगी का नाकारली, याचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. महापालिकेने सांगितल्यानुसार जास्तीत जास्त झाडे लावली जाईल. एकदा मंजुरी मिळाली की वॉर्डाच्या बांधकामास सुरुवात होईल. पुढील आठवडय़ात हे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. मेडिकलचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत.
– डॉ. अभिमन्यू निसवाडे (मेडिकलचे अधिष्ठाता)

Story img Loader