कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून तिघा उद्योजकांना मंगळवारी अटक करण्यात आली. प्रदीप शिराळे, राजू घोरपडे, सुभेंद्र मोर्डेकर अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द मनुग्राफ कंपनीच्या वतीने तक्रार नोंदविली होती.    
शिरोली एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत मनुग्राफ ही कंपनी आहे. प्रीटिंग मशिनरीमधील देशातील सर्वोत्तम कंपनी म्हणून तिचा लौकिक आहे. या कंपनीने प्रीटिंग तंत्रज्ञानाचे कॉपीराईट (स्वामीत्व हक्क) नोंदविलेले होते.
या कंपनीमध्ये पूर्वी प्रदीप शिराळे, राजू घोपडे, सुभेंद्र मोर्डेकर हे तिघेजण सेवेमध्ये होते. त्यांनी मनुग्राफची नोकरी सोडून स्वतंत्रपणे उद्योग सुरू केला. मात्र मनुग्राफ कंपनीमध्ये बनविल्या जात असणाऱ्या मशिनरींचे वेगवेगळे भाग त्यांनी हुबेहूब बनविले होते. तसे पार्ट तयार करून ते बाहेर विकत असल्याची माहिती मनुग्राफ कंपनीला समजली होती. त्यावर मनुग्राफ कंपनीचे व्यवस्थापक अल्बर्ट फर्नाडिस यांनी राजवाडा पोलिसात या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली.