मध्यप्रदेशातील पांढूर्णा मार्गावर वरूडजवळच्या प्रभातपट्टन नजीक लुटारूंच्या गोळीबारात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली असून अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी आरोपीने पत्नीच्या हत्येची सुपारी ३ लाख रुपयांना दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी नितेश अमरघडे (३०, रा. नागपूर) याला मुलताई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या शनिवारी नितेश अमरघडे हा त्याच्या एम.एच. ३१ / ईए ४३१८ क्रमांकाच्या कारने पत्नी हर्षांली, आई विमल, मेहुणी भारती आणि मुलगा शानू यांच्यासोबत मध्यप्रदेशातील धामणगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. वाटेत वरूड ओलांडल्यानंतर प्रभातपट्टनच्या घाटात दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंनी कारवर गोळीबार करून कारमधील रोख लुटून नेली होती. या घटनेत हर्षांलीचा मृत्यू झाला होता. एक गोळी आरोपी नितेशच्या हाताला लागली होती. आरोपी नितेश आणि त्याची मेहुणी भारती यांच्या बयाणात विसंगती आढळून आल्यामुळे पोलिसांचा संशय नितेशवर बळावला होता.
पोलिसांनी नितेशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने या गुन्ह्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणात श्रवण यादव (३०) आणि अमर यादव (२५, दोघेही रा. नंदनवन झोपडपट्टी, नागपूर) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनीच हर्षांलीवर गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपी नितेश अमरघडे याच्या घरातून १७ लाख रुपये आणि आरोपींकडून ३ लाख रुपये जप्त केले आहेत.
नितेश याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्यात पत्नी हर्षांली अडसर ठरू लागली होती. नितेश नागपूर येथे रेल्वे विभागात लिपीक असून हर्षांली देखील रेल्वेमध्येच काटोल येथे नोकरीला होती. घटनेच्या दिवशी नितेश याने काटोल येथूनच धामणगावकडे नेले होते. नितेशला दारूचे आणि सट्टेबाजीचे व्यसन होते. याशिवाय, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्याने १० बेरोजगारांकडून ५० लाख रुपये जमवले होते.
क्रिकेटच्या सट्टय़ात त्याने ३० लाख रुपये गमावले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. यातून बाहेर पडण्यासाठी आणि पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी नितेश याने योजना आखली. पत्नीला आपल्या डोळ्यादेखत संपवण्यासाठी आरोपीने मूळचे देवरिया (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या श्रवण यादव आणि अमर यादव या दोघांना सुपारी दिली. त्यासाठी त्याने ३ लाख रुपये मोजले.
वरूड आणि मुलताई पोलिसांनी आरोपी नितेश याच्या घरावर छापा घातला तेव्हा तेथून एक स्टॅम्पपेपर जप्त करण्यात आला. त्यात ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत त्यांची नावे होती. भविष्यात दरोडा पडला किंवा आपल्याकडील ऐवज लुटला गेल्यास संबंधितांची रक्कम परत करण्याची जबाबदारी आपली राहणार नाही, असे त्यात लिहून घेण्यात आले होते. घटनेच्या काही तासांपूर्वी हा स्टॅम्पपेपर तयार करण्यात आला होता, हेही स्पष्ट झाले आहे.

Story img Loader