जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन्यजीव जंगलात मुक्तसंचार करत असताना पिंजऱ्यात अडकून पडलेले तीन बिबटे निदान आजच्या दिवशी तरी जंगलात मोकळा श्वास घेऊ द्या, अशी आर्त हाक डरकाळी फोडून वनाधिकाऱ्यांकडे करत आहेत. बिबटय़ाच्या या हाकेत पिंजऱ्यात अडून पडल्याच्या वेदनेसोबत जंगलात मित्रांसोबत मुक्तसंचार करू शकत नसल्याचे दु:खही आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोन कार्यालयात जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त सलग सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने या जिल्ह्य़ातील वनखात्याचे सर्व कार्यालय उत्साहात कामाला लागले असून ताडोबाच्या जंगलातही वन्यजीव मुक्तसंचार करत हा सप्ताह साजरा करत आहेत. ताडोबाचा राजा जरी वाघ असला तरी येथे वन्यजीवांची चांगलीच भरमार आहे. पट्टेदार ढाण्या वाघ आपल्याच मस्तीत डरकाळी फोडत आनंद साजरा करत आहे, तर चपळ व अतिशय देखणा बिबटय़ा, जमीन उकरत जंगलात फिरणारे अस्वल, चांदण्यांची बरसात केल्याप्रमाणे दिसणारा कांचनमृग-चितळ, डेरेदार वृक्षासारखी शिंगे असलेले सांबर, भीमकाय तृणभक्षी रानगवा, मस्तवाल रानडुक्कर, चौकस निलगाय, कळपानेच वावरणारे शिकारी रानकुत्रे, भित्रे काकर, सजग चौशिंगा, असे ४५ जातींचे वन्यप्राणी येथे उत्साहात वास्तव्याला आहेत. याशिवाय, रात्रीच्या काळ्या पडद्याआडून बाहेर पडणारे उदमांजर, चांदी अस्वल, उडणारी खार, राजमांजर ही ताडोबाची आकर्षणे समजली जातात. या प्रकल्पात तीन हत्तीही आहेत. सर्व वन्यजीव मस्तीत सहभागी झाले असताना पिंजऱ्यात अडकून पडलेले तीन बिबटे मुक्तसंचार करण्याच्या प्रतीक्षेची वाट बघत आहेत.
मोहुर्ली वन परिक्षेत्रात दोन, तर रामबाग नर्सरीत एक, असे एकूण तीन बिबटे पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. या तीन बिबटय़ांनाही वन्यजीव सप्ताहात मौजमस्ती करण्याची इच्छा आहे, परंतु मोहुर्ली येथील दोन बिबटे तर सलग दोन वर्षांपासून पिंजऱ्यात बंदिस्त आहेत. माना येथील बिबटय़ा नुकताच जेरबंद केला आहे. तत्पूर्वी, या बिबटय़ालाही मोहुर्ली येथेच ठेवण्यात आले होते, परंतु रेडिओ कॉलर लावून त्याची सुटका करण्यात आली. यानंतरही त्याचे हल्ले सुरूच असल्याने पुन्हा त्याला बंदिस्त करण्यात आले, तर मोहुर्ली येथील एक बिबटय़ा चिचपल्ली व दुसरा आगरझरी येथून आणलेला आहे. मानवाने जंगलात येणे सुरू केल्यापासून वन्यजीवांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातूनच वन्यजीव-मानव हा संघर्ष उभा राहिला आहे. मात्र, या संघर्षांत माणूस शहरात मुक्तसंचार करत असला तरी वन्यजीवांना पिंजऱ्यातच अडकून पडावे लागते, असेच काहीसे भाव या दोन्ही बिबटय़ांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे.
चिचपल्ली येथे जेरबंद केलेल्या बिबटय़ाला काही दिवस आमटे फार्महाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून हा बिबटय़ा मोहुर्लीत आला आहे. आज या घटनेला दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. एखाद्या बिबटय़ा सलग दोन वष्रे पिंजऱ्यात जेरबंद राहिला की, त्याचे जंगलातील अस्तित्व नाहीसे होते. तसाच काहीसा प्रकार या बिबटय़ासोबतही झालेला येथे बघायला मिळत आहे, तर दुसरा बिबटय़ा केवळ नरभक्षक असल्याची शंका असल्यामुळेच पिंजऱ्यात अडकून पडलेला आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्ताने तरी आम्हाला मुक्तसंचार करायला मिळेल, असा भाव या बिबटय़ांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, परंतु निष्ठुर वनाधिकारी व तेवढेच क्रूर मानव यामुळे तिन्ही बिबटे नाइलाजास्तव पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. आता त्यांना मृत्यूपर्यंत पिंजऱ्यातच दिवस काढावे लागणार आहेत. सध्या दोन बिबटे जेथे वास्तव्याला आहे त्याच परिसरात रेस्क्यू सेंटर उभारण्याची वनखात्याची योजना आहे. तसा प्रस्ताव वन मंत्रालयाकडे पाठविल्याची माहिती ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक नरबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या प्रस्तावाला व निधीला मान्यता मिळताच रेस्क्यू सेंटर तातडीने सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मात्र, तोपर्यंत या तिन्ही बिबटय़ांना आणखी किती वन्यजीव सप्ताह पिंजऱ्यात काढावे लागतात, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वन्यजीव सप्ताहातही तीन बिबटय़ांचा श्वास पिंजऱ्यातच कोंडलेला!
जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन्यजीव जंगलात मुक्तसंचार करत असताना पिंजऱ्यात अडकून पडलेले तीन बिबटे निदान आजच्या दिवशी तरी जंगलात
![वन्यजीव सप्ताहातही तीन बिबटय़ांचा श्वास पिंजऱ्यातच कोंडलेला!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/10/NAG51.jpg?w=1024)
First published on: 02-10-2013 at 08:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three leopard in cage on the week of forest