एकाच दिवशी दोन किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित करून एकमेकांचा कपाळमोक्ष करण्याची मराठी निर्मात्यांची जुनी खोड अनेकदा धडा घेऊनही अजूनही मोडलेली नाही. अगदी दीड महिन्यांपूर्वी एकाच दिवशी पाच चित्रपटांनी ‘डोके आपटून’ घेतल्यानंतर आता येत्या शुक्रवारी पुन्हा तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पावर’, ‘भुताचा हनिमून’ आणि ‘झपाटलेला-२’ हे तीन चित्रपट एकत्र प्रदर्शित होत असल्याने मराठी चित्रपटांचा ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबत तीनही चित्रपटांच्या निर्मात्यांची भूमिका स्वच्छ असून एकही निर्माता आपला चित्रपट पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाही.१९ एप्रिल रोजी पाच मराठी चित्रपट आमनेसामने उभे ठाकले होते. हे पाचही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असल्याने खेळाच्या वेळा, चित्रपटगृहे आणि प्रेक्षक या तीनही घटकांची विभागणी झाली. परिणामी, कोणालाच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मराठी निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करताना सामंजस्य दाखवावे, एकाच दिवशी दोन किंवा त्यापेक्षा जास्त मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांसमोर येण्याचे टाळावे, वगैरे चर्चा त्या वेळी खूप घडल्या. मात्र हा काथ्याकूट होऊनही दीडच महिन्यानंतर पुन्हा एकदा तीन चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन मिळत नाही, असा ओरडा नेहमीच होतो. एकटय़ादुकटय़ा चित्रपटाला स्क्रीन मिळताना अनेक संकटांचा सामना करावा लागत असताना तीन चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये कशी संधी मिळणार, हादेखील प्रश्न आहे. ‘झपाटलेला-२’च्या मागे वायकॉम-१८सारखी बडी कंपनी असल्याने त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. मात्र इतर निर्मात्यांसमोर ही समस्या आ वासून उभी असेल. या पुनरावृत्तीमुळे हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये सातत्याने आढळणाऱ्या सामंजस्याचा अभाव पुन्हा एकदा मराठी चित्रपटनिर्मात्यांमध्ये दिसून येत आहे. ‘झपाटलेला-२’ हा पूर्वी आलेल्या ‘झपाटलेला’चा पुढील भाग आहे. ‘भुताचा हनिमून’ हीदेखील एक चमत्कृतीपूर्ण गोष्ट आहे. तर सत्तास्पर्धेत सामान्य माणसाची ताकद हा ‘पावर’ या चित्रपटाचा विषय आहे. चित्रपटांचे विषय भिन्न असले, तरीही एकाच वेळी तीनही चित्रपटांच्या वाटय़ाला प्रेक्षकांचा प्रतिसाद येऊ शकत नाही, हे गेल्या वेळच्या ‘अपघाता’वरून सिद्ध झाले आहे.

ही दुर्दैवी गोष्ट
महेश कोठारे (झपाटलेला-२)
एकाच दिवशी तीन चित्रपट एकमेकांसमोर येणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र आम्ही ७ जून ही प्रदर्शनाची तारीख १ मे रोजीच जाहीर केली होती. त्या वेळी या तारखेला एकही चित्रपट नव्हता. अचानक इतर दोन चित्रपट कुठून आले, हे माहिती नाही. माझ्या माहितीत १४ जूनला एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही. या दोनपैकी एका चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यास होणारे नुकसान टळू शकेल.

किती वेळा पुढे जायचं?
राजू मेश्राम (पावर)
इतर मराठी चित्रपटांचा विचार करून आम्ही दोन वेळा आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आम्ही १७ मे, २४ मे अशा तारखा ठरवल्या होत्या. मात्र दरवेळी इतर चित्रपटांसाठी आम्ही मोकळे रान दिले. शाळा सुरू झाल्या की, पालक चित्रपट बघण्याऐवजी मुलाच्या शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यात व्यग्र असतात. त्यामुळे ७ जूनच्या पुढची तारीख आम्हाला परवडणारी नव्हती.

सामना तर होणारच!
के. सुब्रह्मणियन (भुताचा हनिमून)
आमचा चित्रपट ७ जूनला प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही १०-१५ दिवस आधीच घेतला. आमचा चित्रपट इतर दोन चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे इतर दोन चित्रपटांप्रमाणे लोक आमचाही चित्रपट नक्कीच बघतील. आम्ही ही तारीख सोडून कोणत्याही तारखेला चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले, तरी त्या दिवशीही एखादा मराठी चित्रपट समोर येणारच आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांची संख्या लक्षात घेता हा सामना अटळ आहे.

Story img Loader