जिल्हा प्रशासन दुष्काळाचा सामना करत आहेत, मात्र जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री दुष्काळाचे राजकारण करून शेतक ऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना खूष करत आहेत असा गंभीर आरोप खासदार गांधी यांनी केले. छावण्यांचे वाटपही त्यांच्या दबावातून पक्षनिहाय होत आहे असे ते म्हणाले.
लोकसभा अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला खासदार गांधी यांनी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधून संसदेत ते मांडणार असलेल्या विषयांची माहिती दिली.        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत घेतलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीतील चर्चेबाबतही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य व केंद्र स्तरावर नगरशी संबधित अनेक विषय आहेत. त्यासंबधी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे असे गांधी म्हणाले. भाजपचे माजी शहराध्यक्ष सुनिल रामदासी, श्रीकांत साठे, शहर सरचिटणीस अनिल गट्टाणी, सुवेंद्र गांधी, कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब पोटघन आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्य़ातील दुष्काळ तीव्र आहे, मात्र सरकार योग्य पद्धतीने त्याचा सामना करत नाही असे गांधी यांनी सांगितले. पाण्याची टंचाई आता अधिक तीव्र होणार आहे, याच काळात जनावरांना चाऱ्याची गरज होती तर सरकारने छावण्यांचा खर्च कमी केला. खुराक देण्याचे दिवस कमी केले. काही गावांमध्ये छावणी नको तर फक्त चारा डेपो हवा आहे, पण शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे छावणी सुरू केली जाते असा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांवर गांधी यांनी टिका केली. विशेषत: पाचपुते यांचा जिल्हा प्रशासनावर दबाव आहे. त्यामुळेच दुष्काळ निवारणाचे काम प्रभावी होत नाही. तरीही जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी चांगले काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही रोजगार हमीच्या तसेच अन्य कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवून आहेत. कर्जतमधील भ्रष्टाचार भाजपच्याच कार्यकर्त्यांनी बाहेर काढला असे त्यांनी सांगितले.
नगर शहराकडे तुमचे दुर्लक्ष झाले आहे, केंद्र सरकारशी संबधित दिल्लीतील कामांसाठी महापालिका तुमच्याशी किंवा तुम्ही मनपाशी संपर्कात आहात का असे विचारल्यावर गांधी यांनी मनपाबाबत असमाधान व्यक्त केले. त्यांच्याकडून कसलेही सहकार्य मिळत नाही, त्यामुळे माझ्या पद्धतीने मी काम करतो, पुरातत्व विभागाच्या जाचक नियमांचा प्रश्न संबधित विभागाकडे नेला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबाबतचे पत्र दिले आहे. सावेडी भुयारी गटार योजनेचाही पाठपुरावा सुरू आहे असे गांधी यांनी सांगितले. मनपात तुमचीच सत्ता आहे, तरीही सहकार्य मिळत नाही कसे म्हणता याकडे लक्ष वेधल्यावर त्यांनी माझी तक्रार प्रशासनाबाबत आहे असे स्पष्ट केले.
पक्षातील हालचालींबाबत विचारले असता गांधी यांनी सर्व काही व्यवस्थित आहे असे उत्तर दिले. केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे येत्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे. दिल्लीत भाजपप्रणित आघाडीची व राज्यात युतीचा सत्ता येणार हे नक्की आहे असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
लोकसभा अधिवेशनात परळी-बीड-नगर या रेल्वे मार्गाची मागणी लावून धरणार आहे. तसेच दौंड-नगर-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण, शहर व जिल्ह्य़ातील नियोजित रेल्वे उड्डाणपूलांची कामे सुरू व्हावी, याचाही आग्रह धरणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली.

शहरात पोलीस आयुक्तालयाची मागणी
मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत गांधी यांनी तब्बल २९ मुद्दे मांडले. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे रेंगाळलेले काम, महापालिकेवर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती, नगरमध्ये पोलीस आयुक्तालय, हातपंपावर सौरउर्जा पंप बसवणे, नगरमध्ये ३०० खाटांचे रुग्णालय सुरू करणे, िभगार छावणी मंडळास मानद नगरपालिकेचा दर्जा देऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ देणे, शेवगाव ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर करणे आदी विषयांचा समावेश आहे.

Story img Loader