भारती निवास सोसायटी सांस्कृतिक मंडळ आणि रामभाऊ कोल्हटकर यांच्यातर्फे २५ ते २७ जानेवारी या कालावधीत अभ्यासू गायक डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या तीन मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे.
सोसायटीच्या सहकार सदन सभागृह येथे २५ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या मैफलीत ते रात्रीचे राग, २६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या मैफलीत संध्याकाळचे राग आणि २७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या मैफलीत ते सकाळचे राग सादर करणार आहेत. मराठी लावणी आणि नाटय़संगीत यावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही पदवी मिळाली आहे. त्यांना ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या गायकीचे शिक्षण आणि संगीताचे संस्कार लाभले आहेत. त्यांनी अनेक वाद्यांचा अभ्यास करून ती वाद्ये शिकले आहेत.
आपल्या मैफलीमध्ये ते ध्रुपद, ख्याल, तराणा, ठुमरी, टप्पा, भजन, नाटय़संगीत अशा प्रकारांचा आविष्कार करतात. त्यांनी ‘संगीत कला विहार’ या मासिकाचे संपादक म्हणून काम केले असून कलावंतांचे आरोग्य, स्वास्थ्य या विषयांचाही अभ्यास करून ‘कला आयुर्वेद’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.
पारंपरिक लावणी संगीतावर डॉ. दिग्विजय वैद्य यांनी केलेले काम पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले असून ते सध्या वाशी येथील गांधर्व महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून काम पाहात आहेत.

Story img Loader