राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील राजीव गांधी सिंचन व कार्यक्रमांतर्गत पथदर्शक प्रकल्पासाठी निधी देण्याकरिता विदर्भातील तीन लघु सिंचन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या राजीव गांधी सिंचन व कृषी विकास कार्यक्रमांतर्गत पाणी वापर वृद्धी (वॉटर युटिलायझेशन एन्हान्समेंट) पथदर्शक प्रकल्प राबवण्यात येतात. सिंचनाच्या सोयींचा विकास करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेत विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्य़ातील प्रत्येकी एका प्रकल्पाला निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यानुसार, या तीन तलावांची दुरुस्ती आणि नूतनीकरण या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता देण्यात आली आहे.   मिळालेल्या    निधीपैकी थोडा भार उपवितरण व्यवस्थेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी लाभार्थीने उचलायचा असून, बहुतांश निधी केंद्र सरकार देणार आहे.
चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव येथील लघु पाटबंधारे तलाव २००३ साली पूर्ण झाला असून त्यासाठी १ कोटी ३३ लाख रुपये खर्च आला आहे. या तलावात ७९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी असून त्याची सिंचन क्षमता १४९ हेक्टर आहे. या तलावाला वरील योजनेत ५६ लाख ७८ हजार ५९२ रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी २ लाख १२ हजार ९३८ रुपये लाभार्थीचा हिस्सा राहणार आहे.
अमरावती जिल्ह्य़ातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा गावचा लघु पाटबंधारे तलाव २००९ साली पूर्ण झाला आहे. त्यासाठी ५ कोटी ३१ लाख रुपये खर्च आला होता. १४९१.३८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठी असणाऱ्या या तलावाची सिंचन क्षमता ११५ हेक्टर आहे. या तलावाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाकरिता ५७ लाख ६७ हजार ८६३ रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी लाभार्थीचा सहभागी ३ लाख ७६ हजार २५० रुपये आहे. तिसरा प्रकल्प वर्धा तालुक्यातील दिग्रस गावचा आहे. हा लघु पाटबंधारे तलाव २००१ साली पूर्ण झाला असून त्यावर ३० लाख ८३ हजार ११० रुपये खर्च करण्यात आले. १७६ हेक्टरची सिंचन क्षमता असलेल्या या तलावातील    पाणीसाठी    ९६४.२०    दशलक्ष    घनमीटर आहे. या तलावाच्या कामासाठी राजीव गांधी योजनेंतर्गत ७० लाख ५० हजार २१२ रुपये खर्चाला प्रशासकीय   मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख ५६ हजार ८८० रुपयांचा भार लाभार्थीला उचलायचा आहे.

Story img Loader