‘राज्यातील दुष्काळ अतिशय भीषण असून या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या दुष्काळाची झळ सोळा जिल्ह्य़ांतील बारा हजार गावांना पोहोचली आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळालेला ७७८ कोटी रुपयांचा निधी पुरेसा नाही.’ अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.  
पाटील यांनी शुक्रवारी दुष्काळप्रश्नी राज्यातील सहकारी बँका, सोसायटय़ा आणि सहकारी साखर कारखान्यांची मदत घेण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या संस्थांनी दुष्काळी गावे दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच या भागांतील बालकांच्या तसेच इतर प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दुष्काळी जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा अकस्मात निधी देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.