मुंब्र्यासारखी तीन हजार अनधिकृत बांधकामे नवी मुंबई, पनवेल, उरण भागात सध्या सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडीस आली असून सिडकोने काही महिन्यांपूर्वी या बांधकामांना नोटिसा दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना गरजेपोटी घरे बांधण्याच्या मागणीआड नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे अक्षरश: पेव फुटले असून चार मजल्यांपेक्षा जास्त उंची असलेल्या ३०० इमारतींची बांधकामे सध्या सुरू आहेत, अशी माहिती एका उच्च अधिकाऱ्याने दिली. ही बांधकामे स्थापत्यशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडवून केली जात आहेत. त्यामुळे बांधकामाचे आराखडे मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नसून या बांधकामांना सरकारने रितसर वाढीव एफएसआय देऊन त्यांची पुनर्बाधणी करावी किंवा सध्या सुरू असणाऱ्या बांधकामांना कडक पायबंद घालावा, जेणेकरून नवी मुंबईत मुंब्र्यासारखी दुर्घटना घडणार नाही, अशी मागणी केली जात आहे.
मुंब्रा येथील शिळफाटा-महापे मार्गावर गुरुवारी एक आठ मजली इमारत कोसळून ४१ रहिवाशांचा मृत्यू आणि त्यापेक्षा जास्त रहिवाशी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्हय़ात खूप मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने हरित वसई या सेवाभावी संस्थेने मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे सर्व स्थानिक प्राधिकरणांना न्यायालयाने या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यात पाच लाखांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे जिल्हय़ात असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबईत ही संख्या २३ हजार असून शहरी भागात १३ हजार ३०० बांधकामे अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे सिडकोने आपल्या अहवालात म्हटले आहे. या १३ हजारांमध्ये तीन हजार बांधकामे त्या वेळी सुरू असल्याने सिडकोने त्यांना सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नियंत्रण विभागाने नोटिसा दिल्या असून ही बांधकामे मागील काही वर्षांत उभी राहिलेली आहेत. विशेष म्हणजे या सर्व बांधकामांना सर्वसामान्यप्रमाणे वीज, पाणी या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. सिडकोच्या नवी मुंबई, पनवेल, उरण या भागांत सध्या चाळी आणि टॉवर बांधण्याची जणूकाही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी चाळी बांधून आपला खुंटा भक्कम करणाऱ्या भूमाफियांनी आता त्याच ठिकाणी टॉवर बांधण्यास सुरुवात केली आहे. या हातबट्टय़ाच्या धंद्यात मुंबईतील काही समाजकंटकांचा समावेश आहे. हे सर्व पालिका अधिकारी व पोलीस यांच्या संगनमताने होत असल्याचे दिसून आले आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी अशा बांधकामांना आशीर्वादासाठी एक रक्कम निश्चित केली आहे. पालिका अधिकाऱ्यांची तर काही बांधकामांमध्ये छुपी भागीदारी आहे. त्यामुळे नवी मुंबईत अशी बांधकामे दिवसेंदिवस फोफावत असून मुंब्र्यासारखी एखादी मोठी घटना होण्याची वाट पाहिली जात आहे. यापूर्वी बेलापूर, कोपरखैरणे आणि ऐरोलीत अशा घटना घडल्या आहेत, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे मुंब््रयातील इमारत कोसळल्यानंतरही नवी मुंबईत अशा इमारतींची बांधकामे सुरू आहेत हे दुर्दैव्य असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा